शूटिंग ठप्प, रोजंदारीवरील हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर

    दिनांक :25-Nov-2026
Total Views |
मुंबई
tiger shroff
अभिनेता टायगर श्रॉफच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचे पडसाद आता हिंदी चित्रपटसृष्टीत उमटू लागले आहेत. कलाकारांच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या चिंतेमुळे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पुढे ढकलले जात आहे, तर काही चित्रपटांच्या शूटिंगची ठिकाणे बदलण्यात येत आहेत. परिणामी, संपूर्ण चित्रपट निर्मिती प्रक्रियेवर परिणाम होत असून, रोजंदारीवर काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसमोर रोजगाराचे संकट उभे राहिले आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.



गेल्या महिनाभरापासून हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आहे. टायगर श्रॉफच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि सैफ अली खान यांना धमक्या मिळाल्याच्या बातम्याही समोर आल्या. या घटनांमुळे कलाकारांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली असून, निर्मात्यांना चित्रीकरणाचे नियोजन बदलावे लागत आहे. काही कलाकार चित्रीकरणासाठी तारखा देण्यास टाळाटाळ करत आहेत, तर सार्वजनिक कार्यक्रमांनाही उपस्थित राहण्याबाबत सावध भूमिका घेत आहेत. परिणामी, अनेक चित्रपटांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.

या परिस्थितीचा सर्वाधिक फटका चित्रपटांच्या सेटवर काम करणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्यांना बसत आहे. लाईटमन, स्पॉट बॉय, तंत्रज्ञ आणि एक्स्ट्रा कलाकार यांचे उत्पन्न प्रामुख्याने रोजच्या कामावर अवलंबून असते. चित्रीकरण थांबले किंवा पुढे ढकलले गेले की त्यांच्या हातचे काम आणि त्यातून मिळणारे उत्पन्नही बंद होते. कलाकारांच्या सुरक्षेसाठी निर्मात्यांकडून खबरदारी घेतली जात असली, तरी त्याचा परिणाम संपूर्ण चित्रपट निर्मिती व्यवस्थेवर होत असल्याचे AICWAने निदर्शनास आणून दिले आहे.

संघटनेचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. कलाकार चित्रीकरणासाठी उपलब्ध होत नसल्याने तसेच विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणे टाळत असल्याने निर्मात्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. आपण सातत्याने निर्मात्यांच्या संपर्कात असून, या बदलांचा चित्रीकरणावर होणारा परिणाम जवळून पाहत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, कलाकारांच्या सुरक्षेची चिंता रास्त असली, तरी त्याचा सर्वाधिक आर्थिक भार रोजंदारीवर अवलंबून असलेल्या कामगारांना सहन करावा लागत आहे.

या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुप्ता यांनी २० नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले होते. याबाबत बोलताना त्यांनी कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित केला. कलाकारांकडे आर्थिक पाठबळ असू शकते; मात्र चित्रीकरण बंद पडल्यास सामान्य कामगारांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान कार्यालयाकडून या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले असून, मुख्यमंत्री कार्यालयानेही प्रतिसाद दिला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्राद्वारे कळवण्यात आल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.सुरक्षेच्या कारणास्तव चित्रीकरणाच्या ठिकाणांमध्येही बदल केले जात असल्याचे समोर आले आहे. अभिनेता अहान पांडे आणि अभिनेत्री अनित पड्डा यांच्या भूमिका असलेल्या दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगलाही या परिस्थितीचा फटका बसला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या चित्रपटाचे चित्रीकरण वायआरएफ स्टुडिओमधून गोव्याला हलवण्यात आले. चित्रपटाचे पहिले शूटिंग शेड्यूल गोव्यात पूर्ण करण्यात आले आहे.दरम्यान, कलाकारांच्या सुरक्षेसाठी केवळ चित्रीकरणाच्या वेळीच नव्हे, तर पत्रकार परिषद आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही विशेष खबरदारी घेण्याची मागणी AICWAने केली आहे. अशा कार्यक्रमांना साधारणपणे १०० ते २०० लोक उपस्थित असतात. त्यामुळे या ठिकाणीही पुरेशी सुरक्षा व्यवस्था असणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. चित्रपटांच्या सेटवर पोलिस संरक्षण उपलब्ध करून देण्याबरोबरच कलाकार आणि चित्रपट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कलाकारांची सुरक्षा आणि चित्रपट कर्मचाऱ्यांची उपजीविका या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असल्याने सरकारने या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. चित्रीकरण निर्भय वातावरणात सुरू राहिले नाही, तर त्याचा फटका केवळ मोठ्या कलाकारांना किंवा निर्मात्यांना नव्हे, तर पडद्यामागे काम करणाऱ्या हजारो कुटुंबांनाही बसू शकतो. त्यामुळे बॉलीवूडमधील सुरक्षेचा प्रश्न आता केवळ कलाकारांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण चित्रपटसृष्टीतील कामगारांच्या रोजगाराशी जोडला गेला आहे.