पुणे
Torna Fort Rescue हिवाळ्याची चाहूल लागताच डोंगरदऱ्यांमध्ये भटकंती आणि ट्रेकिंगसाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, निसर्गाच्या सान्निध्यात साहसाचा आनंद घेताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्यास मोठ्या दुर्घटना घडू शकतात, याची प्रचिती पुणे जिल्ह्यातील तोरणा किल्ल्यावर आली. ट्रेकिंगसाठी आलेला २० वर्षीय तरुण पाय घसरून सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी सह्याद्री रेस्क्यू टीम आणि हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाने संयुक्तपणे तब्बल सात तास बचावमोहीम राबविली. अखेर मध्यरात्री दीडच्या सुमारास या तरुणाची सुखरूप सुटका करण्यात यश आले.

कैलास विलास गावडे (वय २०, मूळ गाव मुळशी) असे या अपघातग्रस्त तरुणाचे नाव आहे. या दुर्घटनेत त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून, त्याला सुरक्षितपणे दरीतून बाहेर काढण्यात आले. बचाव पथकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, कैलास गावडे हा सोमवारी ट्रेकिंगसाठी तोरणा किल्ल्यावर गेला होता. किल्ल्यावरील बुधला माची परिसरात फिरत असताना अचानक त्याचा पाय घसरला. त्यामुळे तोल जाऊन तो थेट सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळला. दुर्गम आणि खडकाळ परिसर असल्याने त्याला स्वतःहून बाहेर येणे शक्य नव्हते. या घटनेची माहिती मिळताच त्याच्या बचावासाठी तातडीने प्रयत्न सुरू करण्यात आले.
अपघाताची माहिती वेल्हे पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर पोलीस हवालदार आकाश पाटील यांनी त्वरित सह्याद्री रेस्क्यू टीम आणि हवेली आपत्ती व्यवस्थापन मदत पथकाशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही पथकांचे सदस्य तातडीने घटनास्थळी रवाना झाले. सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू टीम तसेच भोर येथील बचाव पथकाच्या सदस्यांनीही मोहिमेत सहभाग घेतला.
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बचावकार्याला सुरुवात झाली. मात्र, तोरणागडावरील अवघड चढ-उतार, खडकाळ वाटा आणि खोल दरी यामुळे बचावकर्त्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. जखमी तरुणाला बाहेर काढताना त्याला आणखी दुखापत होणार नाही, याची विशेष काळजी घेणे आवश्यक होते. त्यामुळे अत्यंत सावधगिरीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबविण्यात आली.
सुमारे सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचाव पथकांना कैलासला सुरक्षितपणे दरीतून बाहेर काढण्यात यश आले. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास संपूर्ण बचावमोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली. त्यानंतर त्याला किल्ल्याच्या पायथ्याशी आणून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
या संयुक्त बचाव मोहिमेत दोन्ही पथकांच्या एकूण १७ सदस्यांनी सहभाग घेतला होता. प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती, अंधार आणि जखमी तरुणाला सुरक्षित बाहेर काढण्याचे आव्हान असतानाही बचाव पथकांनी दाखविलेली तत्परता आणि समन्वय महत्त्वपूर्ण ठरला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे तरुणाचा जीव वाचविण्यात यश आले.
दरम्यान, हिवाळ्यात तोरणा, राजगड यांसारख्या ऐतिहासिक गडांवर ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते. मात्र, गडावरील निसरड्या वाटा, खोल दऱ्या आणि अवघड चढ-उतार लक्षात घेता पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. योग्य ट्रेकिंग साहित्य, सुरक्षित मार्गाची निवड आणि पुरेशी काळजी घेतल्यास अशा दुर्घटना टाळण्यास मदत होऊ शकते.