चेन्नई
Tamil Nadu महिला जिल्हाधिकाऱ्यांना कथितरीत्या अश्लील संदेश पाठविल्याच्या प्रकरणात तमिळनाडूतील सत्ताधारी तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे आमदार सी. अरुल विग्नेश यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कल्लाकुरिचीच्या महिला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मद्रास उच्च न्यायालयानेही तपासाबाबत निर्देश दिले असून, आमदाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी सरकारी वकिलांना मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून या तक्रारीबाबत सविस्तर Tamil Nadu माहिती घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मंगळवारी न्यायालयात आमदाराविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी उलुंदूरपेट येथील आमदाराच्या निवासस्थानी जाऊन सुमारे तासभर त्यांची चौकशी केली. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
आमदार सी. अरुल विग्नेश यांनी जुलै महिन्यात महिला जिल्हाधिकाऱ्यांना अश्लील स्वरूपाचे संदेश पाठविल्याचा आरोप आहे. तसेच मद्यधुंद अवस्थेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला भेट दिल्याचाही दावा करण्यात आला आहे. मात्र, आमदारांनी यापूर्वी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली आहे.
दरम्यान, समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आलेले आक्षेपार्ह संदेश हटविण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण करून २२ डिसेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
या घटनेवरून तमिळनाडूतील राजकीय वातावरणही तापले आहे. द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन आणि नेत्या कनिमोळी यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर या प्रकरणावरून टीका केली. महिला जिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर संबंधित आमदाराविरोधात वेळेत कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दुसरीकडे, अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई. पलानीस्वामी यांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार सी. अरुल विग्नेश यांना तातडीने अटक करण्यात यावी आणि संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महिला सनदी अधिकाऱ्याशी संबंधित या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, न्यायालयाच्या पुढील सुनावणीत काय घडते आणि तपासातून कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.