UAE मध्ये भीषण बस-ट्रक अपघात; १३ जणांचा मृत्यू

    दिनांक :25-Nov-2026
Total Views |
अल वतन
UAE Bus-Truck Accident
संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) रास अल खैमाह येथे बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून, अन्य १४ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.



मिळालेल्या माहितीनुसार, रास अल खैमाह येथील अल वतन रोडवर हा अपघात घडला. प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे संबंधित ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा करण्यात आला होता. याच वेळी भरधाव बसची ट्रकला जोरदार धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त बसमध्ये एकूण ४१ प्रवासी प्रवास करीत होते.

घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसमधील प्रवाशांना बाहेर काढून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची तीव्रता लक्षात घेता बचावकार्य युद्धपातळीवर राबविण्यात आले.

यूएईच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेत सुरुवातीला ११ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना आणखी दोन जखमींचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १३ वर पोहोचला आहे. या अपघातात अन्य १४ जण जखमी झाले असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

दरम्यान, मृतांमध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याने या घटनेची दखल दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने घेतली आहे. दूतावासाकडून मृत भारतीयांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला असून, स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या दुर्घटनेत नेमक्या किती भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला किंवा किती भारतीय जखमी झाले, याबाबत अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

परदेशात रोजगार आणि अन्य कारणांसाठी वास्तव्यास असलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या दुर्घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. भारतीय नागरिकांच्या मृत्यूचा नेमका आकडा आणि जखमींची माहिती मिळविण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.