उत्तराखंड
uttarakhand baini bhuli yojana महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना आणि मध्य प्रदेशातील लाडली बहना योजनेच्या धर्तीवर आता उत्तराखंड सरकारनेही महिलांसाठी विशेष योजना आणली आहे. ‘बैणी-भुली’ असे या योजनेचे नाव असून, याअंतर्गत पात्र महिलांना एकूण २० हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. डिसेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात १० हजार रुपये देण्यात येणार असून, उर्वरित १० हजार रुपये दुसऱ्या हप्त्यात मिळणार आहेत. या योजनेचा राज्यातील सुमारे ५ लाख २३ हजार महिलांना फायदा होण्याचा अंदाज आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबन आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने या योजनेची घोषणा केली आहे. ग्रामीण भागातील महिलांना केवळ आर्थिक मदत देण्याऐवजी त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. योजनेसाठी सरकारने ५२३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
या योजनेचा पहिला लाभ ग्रामीण भागातील पात्र महिलांना दिला जाणार आहे. विशेषतः बचत गटांशी जोडलेल्या आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ग्रामीण विकास मंत्री भारत सिंह चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण आजीविका मिशन तसेच स्वयंरोजगाराशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
गावांमध्ये शेती, पशुपालन, हस्तशिल्प आणि स्थानिक उत्पादनांच्या निर्मितीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या महिलांना या आर्थिक मदतीच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सध्या सुरू असलेल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आर्थिक बळ मिळू शकते. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढवणे आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, यावरही या योजनेत भर देण्यात आला आहे.
बैणी-भुली योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला एकूण २० हजार रुपये दोन टप्प्यांत मिळतील. डिसेंबरमध्ये पहिल्या हप्त्यापोटी १० हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी १० हजार रुपये दिले जातील. अशा प्रकारे एका लाभार्थी महिलेला एकूण २० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार असून, राज्यातील ५.२३ लाख महिलांना या योजनेत समाविष्ट करण्याचे नियोजन आहे.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच ग्रामीण भागातील स्थानिक व्यवसायांना चालना देण्याच्या दृष्टीने उत्तराखंड सरकारची ही योजना महत्त्वाची मानली जात आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार, स्वयंरोजगार आणि उत्पन्ननिर्मितीच्या संधी उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील आर्थिक स्थितीतही सकारात्मक बदल घडू शकतो.