यूपीमध्ये पुन्हा योगीच? मुख्यमंत्र्यांच्या विधानाने चर्चांना उधाण!

    दिनांक :25-Nov-2026
Total Views |
लखनऊ,
chief-ministers-statement-fuels-speculation उत्तर प्रदेशातील २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारावरून चर्चांना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सूचक विधान केले आहे. भाजपचे निवडणूक चिन्ह असलेले कमळ हेच पक्षासाठी सर्वस्व असल्याचे सांगतानाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, हे सर्वांना माहीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे आगामी निवडणुकीतही योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वाखाली भाजप मैदानात उतरणार का, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
 
chief-ministers-statement-fuels-speculation
 
'एबीपी न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांनी पक्षाच्या नेतृत्वाबाबत आपली भूमिका मांडली. भाजपमधील प्रत्येक उमेदवाराला कमळाच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागते. आपणही याच चिन्हावर निवडणूक लढवणार आहोत. आमच्यासाठी कमळाचे फूल हेच सर्वस्व आहे, असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या विधानाबाबत विचारले असता, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, हे सर्वांना माहीत असल्याचे उत्तर त्यांनी दिले.
 
सौजन्य: सोशल मीडिया 
 
दरम्यान, यापूर्वी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत वेगळी भूमिका मांडली होती. निवडणुकीच्या काळात भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ असेल. निवडणुकीनंतर निवडून आलेले आमदार बैठक घेतील. या बैठकीसाठी केंद्रीय निरीक्षक उपस्थित राहतील आणि आमदारांमध्ये होणाऱ्या सहमतीनुसार नेत्याची निवड केली जाईल, असे मौर्य यांनी सांगितले होते. सध्या योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत. मात्र, पुढील कार्यकाळातही तेच मुख्यमंत्री राहतील की अन्य कोणाला संधी मिळेल, याचा निर्णय निवडून आलेले आमदार घेतील. हा निर्णय घेणे आपले काम नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. भाजपने अद्याप २०२७ च्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा अधिकृत चेहरा जाहीर केलेला नाही.
 
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी उत्तर प्रदेशात भाजपला सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवून देण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यातील सर्व समाजघटकांमधील नेत्यांनी एकत्रितपणे काम करून भाजपला पुन्हा मोठ्या बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केल्याचे त्यांनी सांगितले.
 
उत्तर प्रदेशमध्ये २०२७ मध्ये फेब्रुवारी-मार्चदरम्यान विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. २०१७ पासून भाजपने राज्यात सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. आता आगामी निवडणुकीत सत्ता कायम राखण्याचे भाजपसमोर आव्हान असेल. दुसरीकडे, समाजवादी पक्षानेही निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असून राज्यातील राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले आहे.