कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडला ३४०० वर्षांपूर्वीचा ‘शापाचा खजिना’

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
इजिप्त
ancient egypt archaeological discovery
प्राचीन इजिप्तच्या रहस्यमय इतिहासावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वपूर्ण पुरातत्त्वीय शोध लागला आहे. थीब्स मंदिराच्या भग्नावशेषांजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात संशोधकांना सुमारे ३४०० वर्षांपूर्वीचे पपायरसचे जळालेले तुकडे सापडले आहेत. टपालाच्या तिकिटाएवढ्या आकाराचे असे सुमारे ४० तुकडे असून, त्यांचा संबंध प्राचीन इजिप्तमधील ‘अपोफिस रिच्युअल’ या शापविधीशी असल्याचे समोर आले आहे. या शोधामुळे प्राचीन इजिप्तमधील धार्मिक विधी आणि जादूटोण्याच्या परंपरांबाबत नवी माहिती समोर आली आहे. या संशोधनाची माहिती ‘जर्नल ऑफ द इजिप्शियन लँग्वेज अँड अँटिक्विटीज’मध्ये प्रसिद्ध झाली आहे.



या पपायरसच्या तुकड्यांवर अपोफिसला शाप देण्याशी संबंधित मजकूर असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. अपोफिस हा सूर्यदेव रा यांचा कट्टर शत्रू मानला जात असे. अराजकता, अंधार आणि विनाशाचे प्रतीक असलेल्या या सर्पदेवतेशी सूर्यदेव रा यांचा संघर्ष होत असल्याची प्राचीन इजिप्शियन मान्यता होती. अपोफिसचा प्रभाव नष्ट करण्यासाठी विशेष धार्मिक विधी आणि मंत्रांचा वापर केला जात असे.

आतापर्यंतच्या समजुतींना धक्का

यापूर्वी अपोफिस रिच्युअलची उपलब्ध लिखित प्रत इसवी सनपूर्व चौथ्या शतकाच्या अखेरीची असल्याचे मानले जात होते. मात्र, नव्याने सापडलेले पपायरसचे तुकडे या विधीची परंपरा त्याहून कितीतरी जुनी असल्याचे सूचित करतात. सुरुवातीला सूर्यदेव रा यांना अपोफिसच्या संकटापासून वाचवण्यासाठी या मंत्रांचा वापर होत असे. पुढे या विधीचा उपयोग फॅरोच्या शत्रूंना शाप देण्यासाठीही केला जाऊ लागला. प्रतिकूल हवामान आणि विषारी संकटांपासून संरक्षण मिळवण्यासाठीही लोक या विधीचा आधार घेत असत.

केवळ पुजाऱ्यांपुरता मर्यादित नव्हता विधी

या विधीवर केवळ धार्मिक नेत्यांचेच नियंत्रण होते, अशी संशोधकांची पूर्वी धारणा होती. मात्र, थीब्स परिसरात सापडलेल्या पपायरसच्या तुकड्यांमुळे या समजुतीला नवे वळण मिळाले आहे. कोपनहेगन विद्यापीठातील इजिप्तशास्त्रज्ञ आणि संशोधनाचे सहलेखक फ्रेडरिक हेगन यांच्या मते, या तुकड्यांवरून हा विधी न्यू किंगडमच्या काळात म्हणजेच सुमारे एक हजार वर्षांपूर्वीपासून इजिप्शियन संस्कृतीचा भाग होता, असे दिसून येते.

हेगन यांच्या मते, त्या काळात पुजारी नसलेले सुशिक्षित लोकही जादूगार आणि वैद्य म्हणून काम करत असत. सामान्य नागरिक स्वतःचे संरक्षण करण्यासाठी किंवा शत्रूंवर प्रभाव टाकण्यासाठी अशा जाणकारांची मदत घेत असत. त्यामुळे अपोफिस रिच्युअलचा वापर समाजातील विविध स्तरांमध्ये होत असावा, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.

शाप देण्याची विचित्र पद्धत

या विधीची प्रक्रिया अत्यंत वेगळी होती. पपायरसवर मंत्र लिहिल्यानंतर तो लगेच जाळला जात नसे. सर्वप्रथम त्यावर लिहिलेल्या मजकुराला पायाखाली तुडवले जात असे. त्यानंतर त्यावर सुरीने वार करून थुंकले जात असे. शेवटी संपूर्ण साहित्य आगीत जाळून नष्ट केले जात असे. हा विधी यशस्वी होण्यासाठी पपायरस जाळणे आवश्यक मानले जात होते.

संशोधनाचे सहलेखक फ्रेडरिक हेगन यांच्या मते, विधीचा भाग म्हणून हे साहित्य जाळले जात असल्याने त्याचे अवशेष आजही ओळखता येण्याजोग्या स्वरूपात सापडणे ही अत्यंत दुर्मीळ बाब आहे. त्यामुळे पपायरसचे हे छोटे तुकडे पुरातत्त्व संशोधकांसाठी ऐतिहासिकदृष्ट्या मोठा खजिना ठरले आहेत.