‘रामायण’च्या जागतिक यशावर अमित शाहही भारावले; चित्रपटाच्या टीमचे केले कौतुक

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
मुंबई
amit shah
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाने सध्या जगभरात यशाचा नवा टप्पा गाठला आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांसारख्या कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाला भारतासह परदेशातील चित्रपटगृहांमध्येही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची घोडदौड सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा आणि संपूर्ण टीमची भेट घेतली. या भेटीत त्यांनी चित्रपटाच्या जागतिक यशाचे कौतुक करण्यासोबतच भारतीय संस्कृती आणि वारसा मोठ्या पडद्यावरून जगभर पोहोचविण्याच्या प्रयत्नांचे विशेष अभिनंदन केले.



या भेटीदरम्यान निर्माते नमित मल्होत्रा, दिग्दर्शक नितेश तिवारी, अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी उपस्थित होते. याशिवाय प्राइम फोकसचे बिझनेस हेड नीरज शांघाई यांचाही या भेटीत सहभाग होता. जगभरातील प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल अमित शाह यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. भारतीय सिनेमाच्या माध्यमातून देशाचा सांस्कृतिक वारसा आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे ही मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी नमूद केले.

या भेटीचे वैशिष्ट्य म्हणजे अमित शाह यांनी केवळ चित्रपटाच्या भव्य निर्मिती आणि सिनेमॅटिक सादरीकरणाचेच कौतुक केले नाही, तर रामायण या महाकाव्याच्या विषयाची आणि त्यातील सांस्कृतिक महत्त्वाचीही सखोल माहिती असल्याचे दाखवून दिले. रामायणातील विविध संदर्भ आणि बारकाव्यांबाबत त्यांनी केलेल्या चर्चेने चित्रपटाचे निर्माते आणि कलाकारही प्रभावित झाले. चित्रपटाची कथा, तिचे ऐतिहासिक व सांस्कृतिक संदर्भ आणि महाकाव्य मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न यावरही यावेळी चर्चा झाली.

५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘रामायण’ने प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. भारतीय बाजारपेठेबरोबरच परदेशातही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भव्य दृश्यरचना, व्हिज्युअल इफेक्ट्स, भावनिक कथा आणि कलाकारांच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे. चित्रपटाची जगभरातील कमाई दोन हजार कोटी रुपयांच्या जवळ पोहोचल्याचा दावा करण्यात येत आहे. चित्रपटात रणबीर कपूर यांनी प्रभू श्रीरामांची, साई पल्लवी यांनी माता सीतेची, तर यश यांनी रावणाची भूमिका साकारली आहे. याशिवाय रवी दुबे आणि सनी देओल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी ए. आर. रहमान आणि हॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार हान्स झिमर यांनी सांभाळली आहे. या दोघांच्या संगीताचीही चित्रपटाच्या जमेच्या बाजूंमध्ये गणना होत आहे. नमित मल्होत्रा आणि यश यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. भारतीय महाकाव्याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिनेमॅटिक अनुभवातून सादर करण्यासाठी निर्मात्यांनी अनेक वर्षे तयारी आणि मेहनत घेतली. अमित शाह यांच्याकडून मिळालेल्या कौतुकामुळे चित्रपटाच्या टीमसाठी हा प्रवास आणखी संस्मरणीय ठरला आहे. जागतिक स्तरावर मिळणारे प्रेक्षकांचे प्रेम आणि देशाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मिळालेली प्रशंसा यामुळे ‘रामायण’चे यश केवळ बॉक्स ऑफिसपुरते मर्यादित न राहता भारतीय संस्कृती आणि चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठावर पोहोचविणारी महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणून पाहिले जात आहे.