पाटणा
anant singh बिहारमधील मोकामा येथील आमदार अनंत सिंह यांच्या कन्या शिवांगी यांचा ऋषिकेश यांच्याशी विवाह बुधवारी मोठ्या थाटामाटात पार पडला. या शाही विवाहसोहळ्याच्या निमित्ताने अनंत सिंह यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा बिहारमध्ये सुरू आहे. अनंत सिंह यांच्या नदवां येथील गावात आयोजित या विवाहासाठी वर ऋषिकेश तब्बल १५१ वाहनांच्या ताफ्यासह दाखल झाले. विशेष म्हणजे, वराची एंट्री डिफेंडर गाडीतून झाली, तर विवाहासाठी आलेल्या काही पाहुण्यांनी हेलिकॉप्टरने आगमन केले. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी बिहारसह राज्याबाहेरील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. भोजपुरी गायक आणि अभिनेता पवन सिंह यांच्या संगीत कार्यक्रमाने विवाहसोहळ्याची रंगत आणखी वाढविली.

बुधवारी शिवांगी यांनी ऋषिकेश यांना वरमाला घातल्यानंतर दोघे विवाहबंधनात अडकले. ऋषिकेश हे पाटण्याजवळील बिहटा येथील रहिवासी आहेत. या विवाहाची चर्चा मोकाम्यापुरती मर्यादित न राहता संपूर्ण बिहारमध्ये सुरू झाली. विवाहस्थळी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे नदवां गावात सुमारे १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतुकीवर मोठा परिणाम झाला, तर मोबाईल नेटवर्क सेवाही विस्कळीत झाली. दुपारपासूनच भोजन व्यवस्थेच्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. जेवणासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही जण मंडपाच्या मागील बाजूने भोजनस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करीत होते. भोजनाच्या प्लेट मिळविण्यासाठीही नागरिकांमध्ये धावपळ सुरू झाली. एका वेळी प्लेट हवेत फेकण्यात आल्याचे आणि त्या मिळविण्यासाठी लोकांची झुंबड उडाल्याचेही चित्र पाहायला मिळाले.
या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने आयोजित घोड्यांच्या शर्यतीचीही विशेष चर्चा रंगली आहे. बुधवारी सुरू झालेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती. शर्यत पाहण्यासाठी आलेल्या अनेकांनी चक्क ३३ हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वीजवाहिनीच्या टॉवरवर चढून गर्दी केली. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने आयोजकांना शर्यतीची अंतिम फेरी थांबवावी लागली. शर्यतीच्या ठिकाणी निर्माण झालेली अव्यवस्था लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
आता गुरुवारी घोड्यांच्या शर्यतीची अंतिम फेरी होणार असून, त्यामध्ये विजयी ठरणाऱ्या स्पर्धकाला बक्षीस म्हणून थार मोटारगाडी देण्यात येणार आहे. त्यामुळे या अंतिम फेरीकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे. बुधवारी शर्यत संपल्यानंतर मोठ्या संख्येने लोक अनंत सिंह यांच्या निवासस्थानाच्या दिशेने एकाच वेळी रवाना झाले. त्यामुळे काही काळ चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. गर्दी नियंत्रणात आणताना आयोजकांची मोठी धावपळ उडाली. विवाहसोहळा पार पडला असला, तरी शाही आयोजन, वाहनांचा ताफा, प्रचंड गर्दी आणि घोड्यांच्या शर्यतीमुळे अनंत सिंह यांच्या गावातील हा सोहळा बिहारमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.