आष्टी (बीड)
beed news सकाळी बिबट्याने कुत्र्याच्या पिल्लाची शिकार केली, तर त्याच दिवशी दुपारी कुत्रीने बिबट्याच्या एक वर्षाच्या बछड्यावर हल्ला करून त्याचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथील थोरातवस्तीवर सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. एकाच दिवशी कुत्र्याचे पिल्लू आणि बिबट्याचा बछडा या दोघांचेही मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

आष्टी तालुक्यातील दौलावडगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. या भागात बिबट्याने अनेक श्वानांवर हल्ले करून त्यांना ठार केल्याच्या घटनाही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. सोमवारी सकाळी परिसरात खेळत असलेल्या कुत्र्याच्या पिल्लावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात पिल्लाचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच एका कुत्रीने या परिसरात पिल्लांना जन्म दिला होता.
सकाळी घडलेल्या या घटनेनंतर दुपारच्या सुमारास कुत्रीने बिबट्याच्या सुमारे एक वर्ष वयाच्या बछड्यावर हल्ला केल्याचे समोर आले. या हल्ल्यात बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, घटनास्थळी कुत्र्याचे मृत पिल्लू आणि बिबट्याचा मृत बछडा असे दोन्ही मृतदेह आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे, वनपाल लक्ष्मण तागड, वनरक्षक कल्पना विधाते, युनूस शेख, बन्सी तांदळे, गोरख पवार, कानिफ पवार आणि दत्तू भूकन यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या पथकाने दोन्ही मृतदेहांचा पंचनामा केला. त्यानंतर दौलावडगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कारखिले, डॉ. कुंभार आणि डॉ. काळे यांनी बिबट्याच्या मृत बछड्याचे शवविच्छेदन केले. पुढील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आष्टी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात बछड्याचा दफनविधी करण्यात आला.
या घटनेबाबत वनपाल लक्ष्मण तागड यांनी माहिती देताना सांगितले की, सकाळी बिबट्याने कुत्र्याच्या पिल्लाला ठार केले होते. हल्ल्याच्या ठिकाणी पिल्लाचा मृतदेह आढळला. त्यानंतर दुपारी कुत्रीने बिबट्याच्या बछड्यावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. एकाच दिवसात घडलेल्या या दोन घटनांमुळे दौलावडगाव परिसरातील बिबट्याच्या वाढत्या वावराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.