शोरमामुळे विषबाधेचा उद्रेक; बाधितांची संख्या ११६ वर

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
भिवंडी
bhiwandi shawarma food poisoning
शहरातील वंजारपट्टी नाका परिसरातील ‘ए. के. शोरमा’ दुकानातून शोरमा खाल्ल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीला १७ जणांना विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, आता बाधितांची संख्या तब्बल ११६ वर पोहोचली आहे. यामध्ये लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.





या घटनेतील एकूण ११६ बाधितांपैकी १०३ जणांवर स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांमध्ये ५० पुरुष, ३२ महिला आणि २१ लहान मुलांचा समावेश आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयात दोन रुग्ण उपचार घेत आहेत, तर दोन जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने नऊ रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

शोरमा खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या, पोटदुखी आणि अन्य त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीच्या १७ रुग्णांनंतर बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर हा आकडा ११६ वर पोहोचल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

घटनेची माहिती मिळताच भिवंडी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने कारवाई केली. संबंधित शोरमा दुकानावर धडक कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. विषबाधेच्या या घटनेमुळे शहरातील खाद्यपदार्थांच्या विक्रीतील स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.