नागपूर
bomb threat मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासह नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बस्फोट घडवून उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल गुरुवारी प्राप्त झाल्याने न्यायालयीन परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने सुरक्षा यंत्रणा सक्रिय केली. बॉम्ब शोध व नाशक पथक, श्वान पथक आणि अग्निशमन विभागाच्या मदतीने दोन्ही न्यायालयांच्या परिसरात कसून तपासणी करण्यात आली. मात्र, या शोधमोहिमेत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा बॉम्बसदृश साहित्य आढळून आले नाही.

जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर गुरुवारी सकाळी ११ वाजून २३ मिनिटांनी धमकीचा संदेश प्राप्त झाला. या संदेशात नागपूर खंडपीठ आणि जिल्हा न्यायालयात दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी बॉम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. ‘हनामेलर५४५६’ या जीमेल खात्यावरून हा ई-मेल पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे. धमकीची माहिती मिळताच न्यायालयीन प्रशासनाने तातडीने पोलिसांना कळविले.
धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. न्यायालयाचे कामकाज सुरू असतानाच बॉम्ब शोध व नाशक पथक, श्वान पथक आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या पथकांनी न्यायालयाच्या इमारतींसह परिसराची सखोल तपासणी केली. कोणतीही संशयास्पद वस्तू न मिळाल्याने प्रशासन आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, या कारवाईमुळे न्यायालयीन कामकाज काही काळ विस्कळीत झाले.
या धमकीच्या ई-मेलची प्रत पुढील कार्यवाहीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या महाप्रबंधकांना, नागपूर खंडपीठाच्या प्रशासन विभागाच्या प्रबंधकांना, सदर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना, जिल्हा न्यायालयातील न्यायमंदिर पोलीस चौकीच्या निरीक्षकांना तसेच जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्ष आणि सचिवांना पाठविण्यात आली आहे.
दरम्यान, धमकीचा ई-मेल प्राप्त होताच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांनी नागपूर शहर पोलीस आयुक्तांना पत्र पाठविले. या पत्राद्वारे तातडीने आवश्यक ती कारवाई करून शोधमोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल त्वरित सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. या धमकीमागील व्यक्तीचा शोध घेण्यासह ई-मेलच्या सत्यतेची पडताळणी करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.