चंद्रपूर,
case-registered-against-the-accused जुन्या वैमनस्यातून शेजार्याने बाप-लेकावर चाकूने हल्ला केला. ही घटना शहरातील बाबुपेठ परिसरात बुधवारी रात्री 9.45 वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात मुलगा नितीन मांढरे गंभीर जखमी झाला असून, वाद सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या वडिलांच्या हातालाही चाकू लागला. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रामभाऊ किसन मांढरे (68, रा. ढिवर मोहल्ला, बाबुपेठ वॉर्ड, चंद्रपूर) हे बँकेतून चपराशी पदावरून सेवानिवृत्त झाले असून, कुटुंबासह राहतात. त्यांचा मुलगा नितीन मांढरे हा घरगुती डहाक्याचे (भजन) कार्यक्रम करण्याचे काम करतो आणिा काही मित्रांसह तसेच शेजारीच राहणार्या रवींद्र उर्फ अन्नू नारायण मांढरे याच्यासोबत कार्यक्रमांना जात असतो. मात्र, काही दिवसांपूर्वी रवींद्र मांढरे हा मद्यप्राशन करून डहाक्याच्या कार्यक्रमात गैरवर्तन करीत असल्याने नितीनने त्याला कार्यक्रमात येण्यास नकार दिला होता. तेव्हापासून तो कार्यक्रमांना सोबत जात नव्हता.
बुधवारी नितीन मांढरे हा विठ्ठल मंदिर वॉर्ड येथील देविदास कार्लेकर यांच्याकडे डहाक्याच्या कार्यक्रमासाठी सायंकाळी 4 वाजता गेला आणि कार्यक्रम आटोपून रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घरी परतला. त्यानंतर त्याच दिवशी रात्री सुमारे 9.45 वाजता रामभाऊ मांढरे आणि नितीन घरी बसलेले असताना रवींद्र मांढरे हा घराबाहेर आला. त्याने बाहेरूनच आरडाओरड करीत शिवीगाळ सुरू केली.
हा आवाज ऐकून रामभाऊ मांढरे आणि नितीन बाहेर आले. नितीनने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापाच्या भरात रवींद्र मांढरे याने हातातील चाकूने नितीनवर वार करून त्याला गंभीर जखमी केले. हा वाद सोडवण्यासाठी मध्ये पडलेले वडील रामभाऊ मांढरे यांच्याही उजव्या हाताच्या दोन बोटांच्या मधोमध चाकू लागून ते जखमी झाले. गंभीर जखमी नितीनला कुंटुंबियांनी तातडीने चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर फिर्यादी रामभाऊ मांढरे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी रवींद्र मांढरे याच्याविरोधात कलम 118(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग हाके करीत आहेत.