नवी दिल्ली
chakra award winners देशासाठी शौर्य, साहस आणि अतुलनीय बलिदान देणाऱ्या वीरता पुरस्कार विजेत्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘चक्र’ श्रेणीतील शौर्य पुरस्कार प्राप्त व्यक्तींना मिळणाऱ्या मोफत रेल्वे प्रवासाच्या सुविधेचा विस्तार करण्यात आला असून, आता त्यांना वंदे भारतसह देशातील सर्व प्रकारच्या रेल्वेगाड्यांमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने संरक्षण मंत्रालयाशी विचारविनिमय करून हा निर्णय घेतला आहे. या विस्तारामुळे पुरस्कार विजेत्यांच्या आधीपासून असलेल्या प्रवासविषयक अधिकारांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

भारतीय लष्कराने समाजमाध्यमावरील ‘एक्स’ या व्यासपीठावरून या निर्णयाची माहिती दिली. देशाच्या रक्षणासाठी शौर्य गाजविणाऱ्या वीरांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ही महत्त्वपूर्ण कल्याणकारी योजना विस्तारित करण्यात आल्याचे लष्कराने स्पष्ट केले. रेल्वे मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा निर्णय घेण्यात आला आहे. देशासाठी योगदान देणाऱ्या योद्ध्यांचे धैर्य, त्याग आणि सेवा यांचा गौरव करण्याची सरकारची सामूहिक बांधिलकी या निर्णयातून अधोरेखित होत असल्याचेही लष्कराने म्हटले आहे.
यापूर्वी चक्र मालिकेतील शौर्य पुरस्कार प्राप्त पात्र व्यक्तींना रेल्वेतून आजीवन मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध होती. या सुविधेअंतर्गत परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र या पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तींना प्रवास करता येत होता. तसेच, संबंधित पुरस्कार विजेत्यांना स्वतःसोबत एका सहकाऱ्यालाही त्याच श्रेणीत विनामूल्य प्रवासाची मुभा होती. यासाठी त्यांना प्रथम वातानुकूलित श्रेणी (फर्स्ट एसी) आणि द्वितीय वातानुकूलित श्रेणी (सेकंड एसी) यांचे पूरक कार्ड पास देण्यात येत होते.
यानंतर अशोक चक्र आणि कीर्ती चक्र पुरस्कार विजेत्यांच्या प्रवास सुविधेतही वाढ करण्यात आली होती. त्यांना परमवीर चक्र आणि महावीर चक्र विजेत्यांप्रमाणे प्रथम वातानुकूलित श्रेणी तसेच एक्झिक्युटिव्ह क्लासमधून विनामूल्य प्रवासाची सुविधा देण्यात आली. आता या सुविधेचा विस्तार करून वंदे भारतसह सर्व रेल्वेगाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, भारतातील शौर्य पुरस्कारांची सुरुवात स्वातंत्र्यानंतर झाली. परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र हे पहिले तीन शौर्य पुरस्कार २६ जानेवारी १९५० रोजी सुरू करण्यात आले. मात्र, त्यांची प्रभावी तारीख १५ ऑगस्ट १९४७ निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर आणखी तीन शौर्य पुरस्कार सुरू करण्यात आले. या सहा पुरस्कारांचा प्राधान्यक्रम परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र, कीर्ती चक्र, वीर चक्र आणि शौर्य चक्र असा आहे.
नव्या निर्णयामुळे देशासाठी सर्वोच्च शौर्य गाजविणाऱ्या पुरस्कार विजेत्यांना रेल्वे प्रवासासाठी अधिक व्यापक सुविधा उपलब्ध होणार असून, त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.