तामिळनाडूत पुरुष कर्मचाऱ्यांनाही १५ दिवसांची पितृत्व रजा

मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
चेन्नई,
chief-minister-c-joseph-vijay मुलांच्या संगोपनात वडिलांचाही सहभाग वाढावा आणि प्रसूतीच्या काळात पत्नीला मदत करता यावी, या उद्देशाने तामिळनाडू सरकारने पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवसांची पितृत्व रजा मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी या नव्या सुविधेच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
 
chief-minister-c-joseph-vijay
 
या निर्णयानुसार, राज्य सरकारमधील विवाहित पुरुष कर्मचाऱ्यांना मुलाच्या जन्माच्या १५ दिवस आधी किंवा जन्मानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत कधीही १५ दिवसांची रजा घेता येणार आहे. पुरुष कर्मचाऱ्यांकडून पितृत्व रजेची मागणी करण्यात आल्यानंतर सरकारने या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून हा निर्णय घेतला आहे.
 
प्रसूतीचा काळ आई आणि नवजात बाळ या दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा वेळी पतीला पत्नीच्या सोबत राहता यावे आणि नवजात बाळाची काळजी घेता यावी, यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मुलांच्या संगोपनाची जबाबदारी केवळ आईची नसून वडिलांनीही त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, हा या निर्णयामागील उद्देश आहे.
 
दरम्यान, तामिळनाडू सरकार महिला कर्मचाऱ्यांना ३६५ दिवसांची प्रसूती रजा देत आहे. ऑगस्टमध्ये तिसऱ्यांदा आई होणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठीही प्रसूती रजेचा कालावधी १२ आठवड्यांवरून वाढवून ३६५ दिवस करण्याची घोषणा करण्यात आली होती.
 
महिला कर्मचाऱ्यांच्या प्रसूती रजेच्या सुविधेत यापूर्वीही टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली आहे. २०११ मध्ये ९० दिवसांची रजा सहा महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर २०१६ मध्ये हा कालावधी नऊ महिने करण्यात आला, तर जुलै २०२१ मध्ये तो वाढवून ३६५ दिवस करण्यात आला. आता पुरुष कर्मचाऱ्यांसाठीही १५ दिवसांची पितृत्व रजा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.