शेतकऱ्यांसाठी भरणेंची गुड न्यूज! २० लाखांना मिळणार प्रोत्साहन अनुदान

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
नाशिक
dattatray bharne
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून, केंद्र सरकारच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्याने शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम दिली आहे. ज्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, त्यांनाही लवकरच आर्थिक सहाय्य देण्यात येईल. तसेच नियमितपणे पीककर्जाची परतफेड करणाऱ्या २० लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.



राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, नाशिक तालुक्याचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी होत आहे. नाशिक जिल्ह्यातील १४ तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश असल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले. सध्या पंचनाम्यांचे काम सुरू असून, कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाचे अधिकारी या प्रक्रियेत सहभागी आहेत. केंद्र सरकारकडे यासंदर्भातील अहवाल पाठविण्यात आला आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत अहवाल सादर करण्याची कार्यवाही करणे आवश्यक असल्याने, आवश्यक दुरुस्त्या करून सुधारित प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या शेतकऱ्यांना अद्याप मदतीची रक्कम मिळालेली नाही, त्यांनाही लवकरच मदत देण्यात येईल. यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले. दुष्काळाचे संकट अद्याप संपलेले नसून, पुढील सहा महिने महत्त्वाचे आहेत. त्यामुळे संभाव्य परिस्थितीचा विचार करून सरकारकडून नियोजन केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांसह पशुधनाला कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी विशेष उपाययोजना आखण्यात येत आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून, पशुधनाला चारा कमी पडणार नाही, याची काळजी सरकार घेत आहे. शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांचे वाटपही करण्यात येत असल्याचे भरणे यांनी सांगितले. दुष्काळ हे मोठे संकट असून, त्याचा सर्वांनी मिळून सामना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या दुष्काळी नियोजनाबाबत विचारले असता, ते ज्येष्ठ मंत्री असून, त्यांनी या परिस्थितीसाठी आवश्यक नियोजन केले असेल; मात्र यासंदर्भातील सविस्तर माहिती आपल्याकडे नसल्याचे भरणे म्हणाले.

दरम्यान, शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना अनावश्यक त्रास होणार नाही, याची महावितरणने काळजी घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. राज्यातील सुमारे ३० लाख शेतकरी दोन लाख रुपयांच्या आतील कर्जाच्या संदर्भात पात्रतेच्या कक्षेत असल्याचा उल्लेख करत, त्यापैकी २० लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान लवकरच देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकर मदत मिळेल, असेही त्यांनी आश्वस्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता, भरणे यांनी मुख्यमंत्री हेच गृहमंत्री असल्याचे सांगितले. पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा वहिनी असून, मुख्यमंत्री संपूर्ण राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, तर सुनेत्रा वहिनी पुण्यातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. अजितदादांचा पुणे हा जिल्हा असून, तेथील गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सुप्रिया सुळे यांच्या टीकेमागे तसा उद्देश नसेल, असे मत व्यक्त करताना भरणे म्हणाले की, त्या दोघी एकाच घरातील असून, त्यांना एकमेकींच्या कामाची व्याप्ती आणि स्वरूप चांगलेच ठाऊक आहे. सुनेत्रा वहिनी खंबीर आहेत. त्यांनी आपल्या पतीकडून कामाचे धडे घेतले असतीलच. त्या चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या कामाचे समर्थन केले.