नागपूर,
dr-ambedkar-paid-tribute-in-nagpur संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर महानगरातर्फे गुरुवारी (२६ नोव्हेंबर) संविधान चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचनही करण्यात आले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेच्या २८४ सदस्यांनी भारतीय संविधान स्वीकारले होते. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ देशभरात संविधान दिन साजरा केला जातो. यानिमित्त नागपुरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, महानगर कार्यवाह रवींद्र बोकारे, समरसता सहसंयोजक शंकरराव वानखेडे, बिनाकी भाग संघचालक डॉ. सत्यप्रकाश मंगतानी, अयोध्या भाग संघचालक मनोहर सपकाळ, सोमलवार भाग संघचालक श्रीकांत चितळे, धरमपेठ भाग संघचालक शाम पत्तरकिने, भारतीय विचार मंचचे मुकुंदराव खळतकर, ॲड. भाग्यश्री दिवाण, विवेक विचार मंचचे राजू साळवे आणि सचिन जांभुळकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली.
यापूर्वी शहरातील विविध भागांतून संविधान जनजागृती बाइक रॅली काढण्यात आल्या. या सर्व रॅली संविधान चौकात एकत्र आल्या. यावेळी 'संविधानाने दिले काय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. याप्रसंगी ॲड. भाग्यश्री दिवाण यांनी संविधानातील मूल्ये प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजावीत आणि लोकशाहीप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. नागपुरातील विविध वस्त्यांमध्येही अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.