फवाद-माहिराच्या मालिकावर भारतात संकट!

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
fawad-mahiras-tv-serials-face-trouble-in-india पाकिस्तानी कलाकार फवाद खान आणि माहिरा खान यांच्या आगामी वेब सीरिजच्या भारतातील प्रदर्शनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. 'जो बच्चे हैं संग समेट लो' या मालिकेच्या प्रदर्शनापूर्वीच केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सला पाकिस्तानी मनोरंजन सामग्रीसंदर्भात यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची आठवण करून दिली आहे. त्यामुळे ४ डिसेंबर २०२६ रोजी होणाऱ्या या मालिकेच्या जागतिक प्रदर्शनानंतर ती भारतीय प्रेक्षकांना पाहता येणार की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
 
fawad-mahiras-tv-serials-face-trouble-in-india
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सला ८ मे २०२५ रोजी जारी केलेल्या सल्ल्याचे पालन करण्यास सांगितले आहे. पाकिस्तानी निर्मितीचे चित्रपट आणि वेब सीरिज भारतीय प्रेक्षकांसाठी स्ट्रीमिंगवर उपलब्ध करून देऊ नयेत, अशी भूमिका या सल्ल्यात मांडण्यात आली होती. यापूर्वी जून २०२५ मध्ये नेटफ्लिक्सने मंत्रालयाला दिलेल्या माहितीत भारतीय ग्राहकांसाठी कोणताही पाकिस्तानी चित्रपट किंवा वेब सीरिज उपलब्ध करून दिलेली नसल्याचे स्पष्ट केले होते. आता त्याच भूमिकेचे पालन करण्याचे निर्देश मंत्रालयाने दिल्याचे समजते.
 
'जो बच्चे हैं संग समेट लो' या मालिकेच्या संभाव्य भारतीय प्रदर्शनावरून मंत्रालयाकडे अनेक तक्रारी आणि आक्षेप नोंदवण्यात आले होते. त्यानंतर नेटफ्लिक्सला पूर्वीच्या सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले. मात्र, ही मालिका भारतात प्रदर्शित होणार की नाही, याबाबत नेटफ्लिक्सकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
 
दरम्यान, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशननेही या मालिकेच्या भारतातील प्रसारणाला विरोध दर्शवला आहे. संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून ही मालिका भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ नये, अशी मागणी केली आहे. याशिवाय नेटफ्लिक्स इंडियासह अन्य स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पाकिस्तानी चित्रपट, वेब सीरिज, गाणी, पॉडकास्ट आणि मनोरंजनाशी संबंधित इतर सामग्रीचे प्रसारण रोखण्याची मागणीही करण्यात आली आहे.
 
आपल्या पत्रात संघटनेने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ८ मे २०२५ रोजीच्या सल्ल्याचा उल्लेख केला आहे. पुलवामा आणि पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यांचा संदर्भ देत पाकिस्तानी मनोरंजन सामग्रीच्या प्रसारणावर आक्षेप घेण्यात आला आहे. अशा सामग्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासोबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कायदा करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.
 
दरम्यान, 'जो बच्चे हैं संग समेट लो' ही नेटफ्लिक्सची पहिली पाकिस्तानी ओरिजिनल वेब सीरिज आहे. मोमिना दुराईद फिल्म्सच्या निर्मितीत तयार झालेली ही मालिका फरहत इश्तियाक यांच्या २०१३ मध्ये प्रकाशित झालेल्या याच नावाच्या उर्दू कादंबरीवर आधारित आहे. प्रेम, विरह, क्षमा आणि नात्यांमधील गुंतागुंत अशा भावनांचे चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे. तीन पिढ्यांमधील सहा प्रेमकथांच्या माध्यमातून मालिकेची कथा पुढे जाते. पाकिस्तान आणि युरोपमधील विविध ठिकाणी, रोमसह, या मालिकेचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
 
या मालिकेत फवाद खान आणि माहिरा खान ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. त्यांच्यासोबत हानिया आमिर, सनम सईद, अहद रझा मीर, हमजा अली अब्बासी, बिलाल अश्रफ, माया अली आणि इक्रा अझीझ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नेटफ्लिक्सने या मालिकेच्या जागतिक प्रदर्शनासाठी ४ डिसेंबर २०२६ ही तारीख निश्चित केली आहे.
 
मालिकेच्या जागतिक प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असली, तरी भारतातील प्रेक्षकांसाठी तिचे प्रसारण होणार की नाही, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. मंत्रालयाच्या सूचनांनंतर नेटफ्लिक्स काय निर्णय घेते, याकडे आता मनोरंजन क्षेत्राचे लक्ष लागले आहे.