आंध्र प्रदेश
andhra pradesh road accident देशातील विविध भागांत भीषण रस्ते अपघातांच्या घटनांनी चिंतेत भर घातली आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात गुरुवारी भरधाव लॉरीने एका वाहनाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर अन्य आठ जण गंभीर जखमी झाले. याडिकी मंडळातील रायालाचेरुवू परिसरात ही दुर्घटना घडली. अपघातातील वाहन हैदराबादहून ताडीपत्रीकडे जात असताना वेगाने आलेल्या लॉरीने त्याला जोरदार धडक दिली. राज्याचे परिवहन मंत्री राम प्रसाद रेड्डी यांनी या घटनेची माहिती दिली. अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून, दुर्घटनेची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, महाराष्ट्रातील पुणे येथेही बुधवारी भरधाव ट्रकने केलेल्या धडकेत तीन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. येवलेवाडी परिसरातील ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयाबाहेरील बसथांब्यावर बुधवारी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बसची प्रतीक्षा करीत थांबलेल्या विद्यार्थ्यांना नियंत्रण सुटलेल्या ट्रकने चिरडले. या घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर अन्य दोन जण जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक बोपदेव घाटाच्या तीव्र उतारावरून खाली येत असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. सुरुवातीला ट्रकने एका अन्य वाहनाला धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या बसथांब्यावर उभ्या विद्यार्थ्यांना ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या पाच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना सिद्धेश राजे, विशाल डांगडे आणि मोहिनी चौधरी या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातही मंगळवारी पहाटेच्या सुमारास स्कॉर्पिओ आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. तेतरहाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुणसागर गावाजवळ लखीसराय-जमुई मुख्य मार्गावर हा अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओची समोरून येणाऱ्या ट्रकशी जोरदार धडक झाली. अपघातातील मृतांमध्ये दोन महिला, एक लहान मूल आणि वाहनचालकासह दोन पुरुषांचा समावेश आहे. मृत सर्वजण मोतिहारी जिल्ह्यातील रहिवासी असून, एकाच कुटुंबातील सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे.
स्कॉर्पिओ जमुईच्या दिशेने येत असताना समोरून आलेल्या ट्रकशी तिची थेट धडक झाली. धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओचा अक्षरशः चक्काचूर झाला. वाहनातील प्रवासी आतमध्ये अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच डायल ११२ चे पोलीस पथक आणि तेतरहाट पोलीस ठाण्याचे प्रभारी इलू उपाध्याय हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू करून जखमी तिघांना लखीसराय येथील सदर रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देशातील तीन वेगवेगळ्या राज्यांत घडलेल्या या अपघातांमुळे भरधाव वाहनांचा वेग आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.