सोनीपत
haryana STF encounter हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील गोहाना येथे रोहतक विशेष कृती दल (एसटीएफ) आणि गुन्हेगारांमध्ये चकमक झाल्याची घटना गुरुवारी घडली. खेरी दमकन-रभडा मार्गावर झालेल्या या चकमकीत दोन आरोपींच्या पायांना गोळ्या लागल्या असून, तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली. आरोपींनी पोलिसांच्या पथकावर ८ ते १० गोळ्या झाडल्या. यावेळी एसटीएफचे उपनिरीक्षक (पीएसआय) मनदीप यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटवर एक गोळी लागली. मात्र, जॅकेटमुळे त्यांचा जीव बचावला. जखमी आरोपी राहुल ऊर्फ नन्हा आणि विकास ऊर्फ विक्की यांना गोहाना येथील नागरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिन्ही आरोपी रभडा गावातील रहिवासी असून, एका प्रॉपर्टी डीलरवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात त्यांचा शोध सुरू होता.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहतक एसटीएफचे पथक प्रॉपर्टी डीलरवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील फरार आरोपींचा शोध घेत होते. याचदरम्यान एसटीएफचे प्रभारी योगेंद्र दहिया यांच्या पथकाला संबंधित आरोपी गोहाना परिसरात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी खेरी दमकन-रभडा मार्गावर सापळा रचला. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. आरोपींकडून आठ ते दहा गोळ्या झाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या गोळीबारादरम्यान एक गोळी पीएसआय मनदीप यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटवर आदळली. मात्र, जॅकेटमुळे त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यात राहुल ऊर्फ नन्हा आणि विकास ऊर्फ विक्की यांच्या पायांना गोळ्या लागल्या. तिसरा आरोपी कृष्ण याला एसटीएफच्या पथकाने घटनास्थळीच पकडले. जखमी दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी २१ सप्टेंबर रोजी घडलेल्या प्राणघातक हल्ल्याशी संबंधित आहे. बडौता गावातील रविंद्र नामक प्रॉपर्टी डीलरवर त्यावेळी हल्ला करण्यात आला होता. जमिनीशी संबंधित एका प्रकरणात न्यायालयात साक्ष देण्यासाठी रविंद्र आले होते. साक्ष नोंदविल्यानंतर ते आपल्या साथीदारांसह स्कॉर्पिओ वाहनातून परत जात होते. त्यावेळी नगर गावातील अड्ड्याजवळ शिवमंदिर परिसरातील एका गल्लीमध्ये हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाचा मार्ग अडविला. त्यानंतर रविंद्र आणि त्यांच्या साथीदारांवर शस्त्रांनी हल्ला करीत अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात रविंद्र यांचा जीव बचावला होता. घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला होता.
या प्रकरणात यापूर्वीच पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. आता रोहतक एसटीएफच्या कारवाईत आणखी दोन आरोपी जखमी झाले असून, तिसऱ्या आरोपी कृष्ण यालाही अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसटीएफ आणि सदर गोहाना पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे.