देवळी,
commercial complex deoli देवळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आकाराने छोटी असली, तरी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जिल्ह्यात प्रभावीपणे कार्य करणाऱ्या या संस्थेने उत्पन्नवाढीसाठी शॉपिंग कॉम्प्लेक्ससह विविध व्यवसाय व उपक्रम सुरू केले आहेत. या माध्यमातून संस्थेच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होत आहे. नवनिर्मित व्यापारी संकुलामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, देवळीच्या आर्थिक व व्यावसायिक विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन माजी खासदार रामदास तडस यांनी केले.
देवळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या नवनिर्मित व्यापारी संकुलाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष गुलाब कामडी, संस्थेचे अध्यक्ष शरद आदमने, खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष अमोल कसनारे, खरेदी-विक्री संस्थेचे उपाध्यक्ष नानाली लाकडे, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर वैद्य, माजी उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर, न. प. सभापती शुभांगी कुर्जेकर, गटनेते उमेश कामडी, नगरसेवक मिलिंद देशमुख, स्वीकृत सदस्य रवी कारोटकर, नगरसेवक विश्वजीता पोटदुखे, संस्थेचे सचिव सतीश टेंभेकर, अंकेक्षक बोदड यांची उपस्थिती होती.
यावेळी नंदकिशोर वैद्य, डॉ. नरेंद्र मदनकर आणि शुभांगी कुर्जेकर यांनीही मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. प्रास्ताविकातून शरद आदमने यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली. मागील ४० वर्षांपासून माजी खा. रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था कार्यरत आहे.commercial complex deoli भविष्यात संस्थेच्या प्रगतीसाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे संचालक संतोष मरघाडे, प्रकाश कारोटकर, प्रकाश देशमुख, सुनील पिपरे, नितीन बकाने, शंकर बेंडे, वसंत तरास, संजय पारिसे, किसना उगेमुगे, गणपत पिपरापुरे, रमेश सातपुते यांच्यासह संस्थेचे सभासद आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.