तेहरान
iranian singer parastoo ahmadi इराणमध्ये हिजाबसंदर्भातील कठोर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रसिद्ध गायिका परस्तू अहमदी यांना ७४ फटके मारण्याची शिक्षा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्या प्रोडक्शन टीममधील अन्य चार सदस्यांनाही हीच शिक्षा भोगावी लागली आहे. आक्षेपार्ह आणि अनैतिक ठरवण्यात आलेला ऑनलाइन आशय तयार करून तो प्रसारित केल्याचा आरोप या पाचही जणांवर ठेवण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली. या कारवाईमुळे इराणमधील महिलांचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीच्या अधिकाराबाबत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.

इराणमधील वृत्तसंस्था एम्तेदादने या प्रकरणाचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. वकील मुस्तफा नीली यांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. ७४ फटक्यांच्या शिक्षेबरोबरच परस्तू अहमदी आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांवर पुढील दोन वर्षांसाठी संगीत आणि कला क्षेत्रात काम करण्यास तसेच देशाबाहेर प्रवास करण्यासही निर्बंध घालण्यात आले आहेत. यापूर्वी जून महिन्यात न्यायालयाने त्यांना ७४ फटके मारण्याची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला सप्टेंबरमध्ये वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, अपील करूनही न्यायालयाने मूळ शिक्षा कायम ठेवली.
नेमकं प्रकरण काय?
या संपूर्ण वादाची सुरुवात डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या एका संगीत कार्यक्रमापासून झाली. परस्तू अहमदी यांनी पुरुष संगीतकारांसोबत एका विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी हिजाब न परिधान करता गाणी सादर केली. इराणमधील कोम शहराजवळ असलेल्या ऐतिहासिक देइर-ए गचिन कारवांसराय येथे या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले होते. त्यानंतर या कार्यक्रमाचा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला. काही काळातच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि इराणी अधिकाऱ्यांचे लक्ष या कार्यक्रमाकडे वेधले गेले.
इराणमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी केस झाकणे बंधनकारक आहे. त्यामुळे हिजाब न घालता सार्वजनिक स्वरूपात संगीत सादर केल्याच्या प्रकाराची तेथील न्यायपालिकेने गंभीर दखल घेतली. अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला बेकायदेशीर ठरवत गायिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात कारवाई केली. ऑनलाइन माध्यमातून प्रसारित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातील आशय आक्षेपार्ह आणि अनैतिक असल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला.
दरम्यान, इराणमधील महिलांच्या हिजाबसंदर्भातील नियमांवरून यापूर्वीही मोठा वाद निर्माण झाला आहे. २०२२ मध्ये महसा अमिनी या तरुणीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण इराणमध्ये तीव्र आंदोलने झाली होती. या घटनेनंतर महिलांच्या हक्कांचा, वैयक्तिक स्वातंत्र्याचा आणि सक्तीच्या हिजाबविरोधातील आंदोलनाचा मुद्दा जागतिक पातळीवर चर्चेत आला होता. आता परस्तू अहमदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना झालेल्या शिक्षेमुळे हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.