श्रीनगर
jammu and kashmir police जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात सुरक्षा यंत्रणांनी मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानमध्ये बसून जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचे संचालन करणाऱ्या पाच हँडलर्सची रियासी पोलिसांनी सुमारे २९ कनाल स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. दहशतवादी नेटवर्कला आर्थिक मदत पुरविणारे स्रोत बंद करून त्यांची आर्थिक ताकद कमकुवत करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या जमिनींची विक्री किंवा हस्तांतरण करून त्यातून मिळणारा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाण्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात आली होती. माहोर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोशल मीडियावरील ‘एक्स’ खात्यावरून या कारवाईची माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, पोलिस महासंचालक नलिन प्रभात यांच्या मंजुरीनंतर रियासी जिल्ह्यातील पाच कुख्यात दहशतवादी हँडलर्सची जमीन जप्त करण्यात आली. हे पाचही आरोपी पाकिस्तानमध्ये राहून दहशतवादी कारवाया चालवत असल्याचा आरोप आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस), बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा (यूएपीए) तसेच अन्य संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद कय्यूम ऊर्फ अब्दुल कय्यूम, बशीर अहमद ऊर्फ मासूम, शौकत अली, मंजूर अहमद आणि इम्तियाज अहमद अशी कारवाई करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. रियासी पोलिसांनी महसूल विभागाच्या मदतीने त्यांच्या मालमत्तांची ओळख पटवून त्यांची पडताळणी केली. तपास आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यूएपीए १९६७ मधील संबंधित तरतुदींनुसार मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी पोलिस महासंचालकांची मंजुरी घेण्यात आली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे पाचही आरोपी दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानात गेले होते. सध्या ते सीमापार राहून दहशतवादी हँडलर्स म्हणून काम करत असल्याचा आरोप आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना निर्देश देणे, त्यांना मदत पुरविणे आणि विविध गटांमध्ये समन्वय साधणे, अशा स्वरूपाच्या कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
या आरोपींच्या मालकीच्या जमिनींची भविष्यात विक्री किंवा अन्य व्यक्तींच्या नावे हस्तांतरण होण्याची शक्यता होती. त्यातून मिळणाऱ्या पैशांचा वापर दहशतवादी कारवायांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी होऊ शकतो, असा तपास यंत्रणांचा संशय होता. त्यामुळे संभाव्य आर्थिक स्रोत रोखण्यासाठी पोलिसांनी ही मालमत्ता जप्त केली. जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षितता कायम राखण्यासह नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे रियासी पोलिसांनी स्पष्ट केले.