लालू यादवांना दिल्ली हायकोर्टाचा मोठा झटका

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली
lalu yadav,
बिहारच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना IRCTC घोटाळा प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. लालू यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव यांनी दाखल केलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. राऊज अव्हेन्यू न्यायालयाने या प्रकरणात आरोप निश्चित करण्याचा दिलेला आदेश रद्द करण्याची मागणी तिघांनी केली होती. मात्र, न्यायमूर्ती स्वर्णा कांता शर्मा यांच्या खंडपीठाने त्यांची मागणी अमान्य करत कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. या प्रकरणातील अन्य आरोपींच्याही याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता राऊज अव्हेन्यू न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी सुरू राहणार आहे.



या प्रकरणात १३ ऑक्टोबर २०२५ रोजी राऊज अव्हेन्यू येथील विशेष न्यायालयाने लालू कुटुंबीयांसह एकूण १४ आरोपींविरोधात आरोप निश्चित केले होते. संबंधित आरोपींवर फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. याशिवाय भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील विविध कलमांनुसारही त्यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्यात आले. या निर्णयाला आव्हान देत लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिका फेटाळल्याने कनिष्ठ न्यायालयात खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) आरोपांनुसार, रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीतील रांची आणि पुरी येथील हॉटेल्सचे कंत्राट देताना निविदा प्रक्रियेत अनियमितता करण्यात आली होती. या व्यवहारांशी संबंधित जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्येही गैरप्रकार झाल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. रेल्वे हॉटेल्सच्या कंत्राटांच्या मोबदल्यात जमीन व्यवहार झाल्याचा आरोप या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे.

दरम्यान, याच प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातही राऊज अव्हेन्यू न्यायालयाने १० सप्टेंबर २०२६ रोजी महत्त्वाचा निर्णय दिला होता. लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, राबडी देवी, सरला गुप्ता, लारा प्रोजेक्ट्स आणि सुजाता हॉटेल यांच्यासह नऊ आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. याशिवाय पी.सी. गुप्ता, विजय कोचर आणि विनय कोचर यांच्याविरोधातही आरोप निश्चित करण्यात आले होते. त्याचवेळी सात आरोपींची आरोपांतून मुक्तता करण्यात आली होती.

न्यायालयाने पाटणा येथे हस्तांतरित करण्यात आलेली जमीन ही गुन्ह्यातून मिळवलेली संपत्ती असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. तसेच लारा प्रोजेक्ट्सला ज्या पद्धतीने लाभ मिळवून देण्यात आला, त्यावरून लालू यादव यांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होत असल्याचेही न्यायालयाने म्हटले होते. लालू यादव यांच्या सांगण्यावरून रेल्वे अधिकाऱ्यांनी रांची आणि पुरी येथील हॉटेल्सच्या भाडेपट्ट्यांची निविदा प्रक्रिया राबवताना अनियमितता केल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष न्यायालयाने नोंदवला होता.

या प्रकरणाचा तपास राजकीय हेतूने प्रभावित झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाची सविस्तर सुनावणी होणे आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. दरम्यान, गौरव गुप्ता, नाथ मल काकरानिया, राहुल यादव, विजय त्रिपाठी, देवकी नंदन तुल्स्यान, राजीव कुमार रेलन आणि एम/एस अभिषेक फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड यांना आरोपांतून मुक्त करण्यात आले होते.

आता दिल्ली उच्च न्यायालयाने लालू कुटुंबीयांसह अन्य आरोपींच्या याचिका फेटाळल्यामुळे IRCTC घोटाळा प्रकरणातील खटल्याची सुनावणी राऊज अव्हेन्यू न्यायालयात पुढे सुरू राहणार आहे. या प्रकरणात न्यायालयात होणाऱ्या पुढील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.