विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! राज्यातील १२४ अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती लागू

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
पुणे
maharashtra scholarship scheme
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (एईडीपी) अंतर्गत येणाऱ्या तब्बल १२४ अभ्यासक्रमांना आता शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळणार आहे. यामध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना’ आणि ‘डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना’ यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत शिष्यवृत्तीपासून वंचित राहिलेल्या पात्र विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.



उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांमध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून कार्यप्रशिक्षणाचा समावेश असलेले पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांना अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (एईडीपी) असे संबोधले जाते. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या आराखड्यातही अशा अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देऊन त्यांची व्याप्ती वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने एईडीपी अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला २४ मार्च २०२६ रोजी झालेल्या सचिवस्तरीय प्रदत्त समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार आता एकूण १२४ अभ्यासक्रमांना दोन्ही योजनांचा लाभ देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या मंजूर अभ्यासक्रमांमध्ये अभियांत्रिकी आणि संगणक क्षेत्रातील विविध पदवी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. याशिवाय वाणिज्य, व्यवस्थापन, कला, डिझाइन, हॉटेल मॅनेजमेंट, स्पोर्ट्स मॅनेजमेंट तसेच कृषी आणि अन्न तंत्रज्ञानाशी संबंधित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे विविध शैक्षणिक शाखांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची संधी उपलब्ध होणार आहे.

मात्र, या योजनांचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना सरसकट मिळणार नाही. संबंधित अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादा, जात प्रवर्गानुसार निश्चित केलेले निकष, पात्रतेच्या अटी आणि शासनाने ठरविलेल्या अन्य नियमांची पूर्तता करावी लागणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती तसेच वसतिगृह निर्वाह भत्त्याचा लाभ मिळेल. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

शिष्यवृत्तीचा लाभ प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमांचे महाडीबीटी पोर्टलवर मॅपिंग करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाआयटी, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि संबंधित संचालनालयांनी प्रचलित कार्यपद्धतीनुसार ही कार्यवाही करायची आहे. तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांसारख्या शिष्यवृत्ती योजना राबविणाऱ्या विभागांनाही त्यांच्या अखत्यारीतील योजनांचा एईडीपी अभ्यासक्रमांमध्ये समावेश करण्यासाठी स्वतंत्र शासन आदेश काढावे लागणार आहेत. त्यानंतर महाडीबीटी पोर्टलवरील मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

याशिवाय भविष्यात विद्यापीठांकडून नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या एईडीपी अभ्यासक्रमांनाही शिष्यवृत्तीचा लाभ द्यायचा असल्यास संबंधित संचालनालयांकडून प्रस्ताव सादर करावा लागेल. त्या प्रस्तावांची छाननी केल्यानंतर स्वतंत्रपणे शासनाची मंजुरी घेणे बंधनकारक राहणार आहे.

दरम्यान, कार्यप्रशिक्षण समाविष्ट पदवी अभ्यासक्रम आणि बी.व्होक. अभ्यासक्रमांना दरवर्षी हजारो विद्यार्थी प्रवेश घेतात. मात्र, शिष्यवृत्ती योजनांसाठी या अभ्यासक्रमांचे महाडीबीटी पोर्टलवर मॅपिंग झालेले नसल्याने अनेक विद्यार्थी आर्थिक लाभापासून वंचित राहत होते. आता १२४ अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती लागू करण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतीचा मार्ग खुला झाला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी व्यक्त केली.