मालेगाव,
mahavitaran डव्हा तीर्थक्षेत्राजवळ चाकातीर्थ प्रकल्पाच्या तपोभूमी परिसरात पाणी उपसा करणार्या विद्युत मोटारींच्या उघड्या तारांमुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तेथे दशक्रिया व पिंडदान विधीसाठी येणार्या नागरिकांच्या जीवितास या उघड्या तारांमुळे गंभीर धोका निर्माण झाला असून, महावितरणने याकडे तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी मालेगाव येथील नितीन पुरुषोत्तम भांडेकर यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर असे की, डव्हा तीर्थक्षेत्राजवळ चाकातीर्थ नदी पात्रातील तपोभूमी हे दशक्रिया आणि पिंडदान विधीसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे मालेगाव तालुक्यासह जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरील अनेक कुटुंबे व नागरिक धार्मिक विधी पार पाडण्यासाठी येथे नियमित येत असतात. सद्यस्थितीत या प्रकल्पातून विद्युत मोटारींद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरू आहे. मात्र, या मोटारींसाठी जोडण्यात आलेल्या विद्युत तारा अनेक ठिकाणी उघड्या व असुरक्षित अवस्थेत पडून आहेत.या उघड्या तारांमुळे २३ नोव्हेंबर रोजी भाविकांसोबत अनर्थ घडण्याची स्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र, ही बाब नागरिकांच्या जीवावर बेतणारी असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित मोटार मालकांनी दक्षता घेऊन तारांची जोडणी व्यवस्थित व सुरक्षित करावी, तसेच महावितरण अधिकार्यांनी या परिसराची पाहणी करून असुरक्षित आणि उघड्या विद्युत तारांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नितीन भांडेकर यांनी केली आहे.
सहायक लेखा अधिकारी जितेंद्र मनोहर निलंबित वाशीम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांची कारवाई वाशीम : रिसोड पंचायत समिती येथील सहायक लेखा अधिकारी जितेंद्र रा. मनोहर यांना कर्तव्यात कसूर आणि वरिष्ठ आदेशांचे पालन न केल्याच्या ठपक्यावरून निलंबित करण्यात आले आहे. वाशीम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी ६ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबतचा आदेश जारी केला आहे.महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ च्या नियम ३ चा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशांचे पालन न करणे, कर्तव्यात कसूर करणे तसेच कार्यालयात अनधिकृत गैरहजर राहणे, असे तीन प्रमुख आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.निलंबन कालावधीत मनोहर यांचे मुख्यालय पंचायत समिती वाशीम राहील. या कालावधीत त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहील. मात्र, निलंबन काळात ते खासगी नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत, याची खातरजमा करून प्रमाणपत्र घेतल्यानंतरच निर्वाह भत्ता अदा करावा, असे निर्देश वाशीम पंचायत समितीच्या गट विकास अधिकार्यांना देण्यात आले आहेत. अन्यथा निर्वाह भत्ता व इतर देय रक्कम शासनाकडे जमा करण्याचे आदेशात नमूद केले आहे.दरम्यान, रिसोड पंचायत समितीतील सहायक लेखा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार तेथील कनिष्ठ लेखा अधिकार्यांकडे सोपवण्यात आला आहे. तसेच निलंबित अधिकारी मनोहर यांची खातेचौकशी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.