अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्यालाही उडवण्याची धमकी

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
मुंबई
amitabh bachchan
मुंबई महानगरपालिकेला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी १० वाजून १२ मिनिटांनी महापालिकेच्या अधिकृत ई-मेलवर हा संदेश प्राप्त झाला. यामध्ये मुंबई महापालिकेचे मुख्यालय आणि महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील ‘जलसा’ बंगल्याचाही या मेलमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.



धमकीच्या ई-मेलमध्ये मुंबईतील मेट्रो स्टेशन, महालक्ष्मी रेसकोर्स आणि सायन्स आचार्य मेट्रो स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या धमकीमुळे महापालिका प्रशासन आणि मुंबई पोलीस यंत्रणेसमोर पुन्हा एकदा आव्हान निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, गेल्या चार महिन्यांत मुंबई महापालिकेला पाच वेळा धमकीचे ई-मेल प्राप्त झाले आहेत. वारंवार अशा प्रकारचे संदेश येत असल्याने यामागील व्यक्ती किंवा टोळीचा शोध घेण्याचे आणि अशा घटनांना आळा घालण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

यापूर्वीही अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती. प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टलाही ग्रेनेडने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनांनंतर सेलिब्रिटींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

मागील धमकीनंतर अमिताभ बच्चन रविवारी नेहमीप्रमाणे चाहत्यांना भेटण्यासाठी ‘जलसा’ बंगल्याबाहेर आले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी बुलेटप्रूफ काचेआडून चाहत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर धमकी देणाऱ्यांकडून बुलेटप्रूफ काचेतूनही हल्ला करण्याची धमकी दिल्याचा दावा करण्यात आला होता.

दरम्यान, अभिनेता सलमान खान, टायगर श्रॉफ आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनांमुळे बॉलिवूडमधील सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आहे. त्यातच वारंवार येणाऱ्या धमकीच्या संदेशांमुळे चिंता वाढली आहे. नव्या ई-मेलची पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून तपासणी केली जात असून, धमकीतील दाव्यांची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही.