ज्वेलरी शॉपबाहेर पाच राऊंड फायरिंग

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
मुंबई
mumbai firing
मुंबईतील माहिम परिसरात बुधवारी सायंकाळी एका ज्वेलरी शॉपबाहेर झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पी.सी. जैन ज्वेलर्स या दुकानाबाहेर पाच राऊंड गोळीबार केला आणि त्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले. गोळ्यांचे आवाज ऐकून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. दुकानाचे मालक आणि सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. घटनेनंतर परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली असून, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही हल्लेखोर दुचाकीवरून ज्वेलरी शॉपबाहेर आले होते. त्यांनी दुकानाच्या दिशेने पाच राऊंड गोळीबार केला आणि त्यानंतर वेगाने दुचाकीवरून पळ काढला. दोघांनीही हेल्मेट घातले होते. तसेच त्यांच्या अंगावर काळ्या रंगाच्या जॅकेटसदृश पोशाख होता. घटनेनंतर समोर आलेल्या सीसीटीव्ही चित्रणात दोन्ही आरोपी दुचाकीवरून पळून जाताना दिसत आहेत. या चित्रणाच्या आधारे पोलिस त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी आणि पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. परिसरातील दुकाने तसेच विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासले जात आहे. हल्लेखोर कोण होते, त्यांनी पळून जाण्यासाठी कोणता मार्ग वापरला आणि या गोळीबारामागील नेमके कारण काय, याचा शोध पोलिस घेत आहेत. ज्वेलरी शॉपलाच लक्ष्य करण्यामागे कोणता हेतू होता, याबाबतही तपास सुरू आहे.

या घटनेचे प्रत्यक्षदर्शी कृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे दुकान पी.सी. जैन ज्वेलर्सपासून आठ ते दहा दुकाने अंतरावर आहे. गोळीबार झाला, त्यावेळी ते आपल्या दुकानात अगरबत्ती लावत होते. त्यांनी प्रत्यक्ष गोळीबार होताना पाहिला नाही; मात्र त्यांच्या दुकानाजवळून एक दुचाकी फुटपाथवरून अतिशय वेगाने जाताना दिसली. त्या दुचाकीवर दोन व्यक्ती होत्या. दोघांनी हेल्मेट आणि काळ्या रंगाचे जॅकेटसदृश कपडे घातले होते. फुटपाथवरून भरधाव वेगाने दुचाकी जात असल्याचे पाहून कृष्णा दुकानाबाहेर आले. त्यावेळी दोन्ही व्यक्ती पळून जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

काही मिनिटांनंतर जवळच्या ज्वेलरी शॉपबाहेर गोळीबार झाल्याची माहिती त्यांना मिळाली. आपण केवळ हल्लेखोरांना दुचाकीवरून पळताना पाहिले असून, त्यांना गोळीबार करताना पाहिले नसल्याचे कृष्णा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हल्लेखोरांचा उद्देश दुकानमालकाला धमकावण्याचा होता की त्यामागे अन्य काही कारण होते, याचा तपास पोलीस करीत आहेत.

विशेष म्हणजे, २५ नोव्हेंबर रोजी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाबाहेरही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाली होती. त्यानंतर मुंबईतील ज्वेलरी शॉपबाहेर झालेल्या गोळीबारामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.