नागपूर,
constitution day संविधान दिनानिमित्त नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या संविधान बचाव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले सिनेअभिनेते प्रकाश राज यांनी विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील लोकशाही व्यवस्था, संविधानाने दिलेले अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सरकारच्या धोरणांवर भाष्य केले.
आज संविधान दिन हा देशासाठी आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस आहे. मात्र, सध्या देशभरात संविधान वाचविण्याचा आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याचा नारा द्यावा लागत आहे. संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठीच संविधान बचाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रकाश राज म्हणाले.
सौरभ दास यांना नोटीस आणि युवकांच्या आवाजाचा मुद्दा
सौरभ दास यांना देण्यात आलेल्या नोटीससंदर्भात बोलताना प्रकाश राज यांनी देशातील नागरिकांना विविध कारणांमुळे अडविले जात असल्याचा आरोप केला. अनेकांना विमानतळावरून ताब्यात घेतले जात आहे. ध्रुव राठी यांनाही झोपेतून नेण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. तिरंगा फडकविण्यासाठीही अडविले जात असल्याचे ते म्हणाले.
देशात अनेक महत्त्वाच्या विषयांवर आवाज उठविणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आवाज दाबला तर तो आणखी बुलंद होईल. सोशल मीडियावरही निर्बंध लादून अभिव्यक्ती स्वातंत्र्य मर्यादित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शांततापूर्ण आंदोलनांना दडपण्यासाठी 'पीस बॉण्ड'चा आधार घेतला जात असल्याचेही त्यांनी म्हटले. दोन दिवस विश्रांती घेऊन पुन्हा आंदोलनासाठी येऊ, पण हा संघर्ष थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.constitution day आजचा युवक शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागपुरातील कार्यक्रमाच्या ठिकाणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना उत्तर
नागपुरात संविधान बचाव कार्यक्रम आयोजित करण्याच्या ठिकाणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रकाश राज यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. "नागपूर भारतात आहे, पाकिस्तानात नाही," असे म्हणत त्यांनी नागपुरात कार्यक्रम आयोजित करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. विमानतळावर पत्रकारांशी झालेल्या या संवादातून प्रकाश राज यांनी संविधान, लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.