पॅकेटबंद पदार्थांवर आता लाल धोक्याचा इशारा!

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
red-warning-sign-on-packaged-food-products पॅकेटबंद खाद्यपदार्थांमधील अतिरिक्त चरबी, साखर आणि मिठाचे प्रमाण ग्राहकांना सहज समजावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक चरबी, साखर किंवा मीठ असलेल्या खाद्यपदार्थांच्या पॅकेटच्या दर्शनी भागावर स्वतंत्र लाल रंगाची चेतावणी चिन्हे लावावी लागणार आहेत. यामुळे ग्राहकांना एखादा पदार्थ खरेदी करण्यापूर्वी त्यातील हानिकारक घटकांची माहिती सहज मिळू शकणार आहे. केंद्र सरकार आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाला (एफएसएसएआय) या व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

red-warning-sign-on-packaged-food-products
न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. न्यायालयाच्या निर्देशानुसार, प्रत्येक खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर लाल रंगातील सहा कोन असलेले स्वतंत्र चेतावणी चिन्ह असणे आवश्यक आहे. संबंधित पदार्थामध्ये चरबी, साखर किंवा मिठाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्यास त्याची स्वतंत्र माहिती या चिन्हाद्वारे द्यावी लागेल. एखाद्या पदार्थामध्ये तिन्ही घटकांचे प्रमाण जास्त असल्यास त्यासाठी तीन वेगवेगळी चेतावणी चिन्हे लावावी लागतील. एकाच चिन्हामध्ये तिन्ही घटकांची माहिती देणे पुरेसे ठरणार नाही.
या नियमांची अंमलबजावणी करताना खाद्यपदार्थांमधील एकूण साखर आणि संतृप्त चरबीचे प्रमाण विचारात घेऊन धोक्याची मर्यादा निश्चित करण्याची जबाबदारी एफएसएसएआयवर सोपवण्यात आली आहे. केवळ अतिरिक्त साखर किंवा चरबीच्या प्रमाणावर आधारित निर्णय न घेता वैज्ञानिक संशोधन आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे निकष ठरवण्यास न्यायालयाने सांगितले आहे. मर्यादा खूप कमी ठेवल्यास बहुतांश खाद्यपदार्थांवर चेतावणी द्यावी लागेल आणि त्यामुळे ग्राहक अशा सूचनांकडे दुर्लक्ष करू शकतात. दुसरीकडे, मर्यादा अधिक ठेवल्यास आरोग्यासाठी हानिकारक घटकांचे प्रमाण जास्त असलेले पदार्थही या नियमांच्या कक्षेबाहेर राहू शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
चेतावणी चिन्हे ग्राहकांच्या सहज नजरेस पडावीत, यासाठी त्यांच्या आकाराबाबतही न्यायालयाने स्पष्टता दिली आहे. प्रत्येक लाल चिन्हाने खाद्यपदार्थाच्या पॅकेटच्या दर्शनी भागावरील एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे चार ते पाच टक्के जागा व्यापणे अपेक्षित आहे. तसेच चिन्हांवरील मजकूर सामान्य प्रकाशात सहज वाचता येईल, एवढ्या मोठ्या आकारात असावा. यासोबतच केंद्र सरकारला २०२० मधील अन्न सुरक्षा आणि लेबलिंगविषयक नियमांची योग्य अंमलबजावणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
केवळ खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर चेतावणी देऊन चालणार नाही, तर लहान वयापासूनच मुलांमध्ये आरोग्यदायी आहाराबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले. यासाठी शालेय अभ्यासक्रमात आवश्यक बदल करण्याची सूचना करण्यात आली आहे. मुलांना पौष्टिक आहाराचे महत्त्व केवळ पुस्तकांमधून न शिकवता प्रत्यक्ष उपक्रमांच्या माध्यमातून समजावून सांगावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. शाळांमध्ये कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करून कोणते पदार्थ आरोग्यासाठी चांगले आहेत आणि कोणते पदार्थ टाळले पाहिजेत, याची माहिती विद्यार्थ्यांना देता येईल.
दरम्यान, या नव्या चेतावणी व्यवस्थेसंदर्भात नियमांचा मसुदा तयार करण्याच्या कामात किती प्रगती झाली आहे, याचा अहवाल एफएसएसएआयला सादर करण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी प्राधिकरणाला प्रतिज्ञापत्रही दाखल करावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी दहा आठवड्यांनंतर निश्चित केली आहे. त्यामुळे आगामी काळात पॅकेटबंद खाद्यपदार्थांच्या लेबलिंग व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे.