रामायण नाटकात हनुमानाची भूमिका साकारताना कलाकाराचा मृत्यू

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
ओडिशा
odisha
कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रामायण नाटकात हनुमानाची भूमिका साकारत असताना एका कलाकाराचा अचानक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ओडिशातील गंजाम जिल्ह्यात घडली. मिथुन प्रधान (वय ३५) असे मृत कलाकाराचे नाव आहे. नाटक सुरू असतानाच ते अचानक रंगमंचावर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे उत्सवाच्या वातावरणावर शोककळा पसरली असून, नाटकाचा प्रयोगही मध्येच थांबविण्यात आला.



मंगळवारी रात्री पाटापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौडिया गावात ही घटना घडली. कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने ग्रामस्थांनी रामायण नाटकाचे आयोजन केले होते. या नाटकात मिथुन प्रधान हनुमानाची भूमिका साकारत होते. यापूर्वीही त्यांनी रामायणातील महत्त्वपूर्ण अशा बालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची दाद मिळविली होती. मात्र, यावेळी अभिनय सुरू असतानाच अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि ते मंचावर कोसळले. ही घटना पाहताच उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना अदापाडा येथील जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मिथुन प्रधान यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, अशी शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तथापि, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. पाटापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी दीप्ती रंजन बेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेसंदर्भात पोलिसांकडे कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. तसेच याप्रकरणी अद्याप गुन्ह्याची नोंदही करण्यात आलेली नाही.

मिथुन प्रधान हे गावातील लोकप्रिय रंगकर्मी होते. अभिनयासोबतच ते आपल्या नाट्यसंस्थेचे व्यवस्थापनही पाहत होते. रामायणावर आधारित नाटकांमधील त्यांच्या अभिनयाची आणि वेगवेगळ्या धाडसी कसरतींची परिसरात विशेष चर्चा होती. बैलगाडीचे चाक उचलणे तसेच दातांनी मोटारसायकल उचलण्यासारखे थक्क करणारे प्रयोग ते सादर करीत असत. त्यांच्या नाट्यसंस्थेचे गंजाम जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यांमध्येही मोठे नाव होते.

रंगभूमीवरील कारकिर्दीसोबतच मिथुन हे व्यवसायाने छोटे व्यावसायिक होते. गावात त्यांचे नाश्त्याचे दुकानही होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीय, ग्रामस्थ आणि सहकलाकारांना मोठा धक्का बसला आहे. काही वेळापूर्वी ज्या रंगमंचावर जय श्रीरामच्या जयघोषाने आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांनी परिसर दुमदुमत होता, त्याच ठिकाणी आता शोककळा पसरली आहे.

दरम्यान, अलीकडेच उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथेही एका महिला उपनिरीक्षकाचा बाथरूममध्ये मृतदेह आढळला होता. त्यांचाही मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला होता.