ओवैसींचा यूपीमध्ये सत्ताबदलाचा नारा!

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
लखनऊ,
owaisis-call-for-a-change-of-power-in-up उत्तर प्रदेशात २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि आझाद समाज पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी संविधान दिनानिमित्त लखनौमधील रमाबाई मैदानावर आयोजित सभेत शक्तिप्रदर्शन केले. यावेळी ओवैसी यांनी आगामी निवडणुकीत चंद्रशेखर आझाद यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच भाजपला सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्रितपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

owaisis-call-for-a-change-of-power-in-up
सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांचा उल्लेख करत ओवैसी यांनी या गर्दीतून भाजप, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाला संदेश गेल्याचा दावा केला. जनतेला यापुढे संधीसाधू राजकारण आणि फसवणूक मान्य नसल्याचे सांगत त्यांनी सामाजिक सहभाग, बंधुता आणि न्यायाच्या राजकारणावर भर दिला.
ओवैसी यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधाननिर्मितीतील योगदानाचा विशेष उल्लेख केला. संविधान दिनाचे महत्त्व सांगताना त्यांनी म्हटले की, बाबासाहेबांनी देशाला हिंदू राष्ट्राच्या दिशेने जाण्यापासून रोखले. संविधानाची सुरुवात कोणत्याही धर्माच्या किंवा देवतेच्या नावाने न होता 'आम्ही, भारताचे लोक' या शब्दांनी झाली. संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि न्यायाचा अधिकार दिला आहे. देशाचा कारभार याच घटनात्मक मूल्यांच्या आधारे चालला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
चंद्रशेखर आझाद हे सामाजिक परिवर्तन आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे जाहीर करत ओवैसी यांनी त्यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. आझाद यांचे यश म्हणजे सामाजिक न्याय आणि शोषित घटकांच्या हक्कांच्या लढ्याला मिळणारे यश असल्याचेही ते म्हणाले. उत्तर प्रदेशातील मुस्लिम, दलित आणि वंचित समाजाच्या समस्या समान असून, या घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी ओवैसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारावरही टीका केली. संविधानाचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन करत, संविधान कमकुवत झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका मुस्लिम, दलित आणि दुर्बळ घटकांना बसेल, असा दावा त्यांनी केला. आपल्या मताचा योग्य वापर केल्यास अन्याय आणि शोषणाविरोधात बदल घडवता येऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील सत्ताकारणावर भाष्य करताना ओवैसी यांनी ठाकूर आणि यादव राजकारणावर निशाणा साधला. स्वराज्य म्हणजे एखाद्या विशिष्ट समाजाची किंवा राजकीय घराण्याची सत्ता नव्हे, तर संविधानाने दिलेले समान अधिकार आणि सत्तेत योग्य वाटा मिळणे होय, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात कधी ठाकूर तर कधी यादव समाजाचे वर्चस्व राहिल्याचा आरोप करत त्यांनी दोन्ही प्रकारच्या राजकारणाला विरोध केला. आता कोणत्याही विशिष्ट समाजाची राजवट नको, तर सामान्य जनतेचे सरकार स्थापन झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, कांठ मतदारसंघाचे माजी समाजवादी पक्षाचे आमदार अनीसुरहमान सैफी यांनी एआयएमआयएममध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे उत्तर प्रदेशातील सामाजिक परिवर्तन आघाडीच्या राजकीय तयारीला आणखी बळ मिळाल्याचे मानले जात आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासोबतच राज्यात नवे राजकीय समीकरण निर्माण करण्याचा प्रयत्न या आघाडीकडून सुरू असल्याचे सभेतून स्पष्ट झाले.