न्यायालयाबाहेर गोळीबार सहा आरोपी सहा दिवस पोलिसांच्या ताब्यात!

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
पुणे
pune court attack
शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयाच्या परिसरात २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या गोळीबार आणि कोयत्याच्या हल्ल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. जुन्या गुन्हेगारी प्रकरणातील आरोपी असलेल्या ३५ वर्षीय मंदार किवळे याच्यावर सहा जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहाही आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, २ डिसेंबर रोजी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.



या हल्ल्यामागे कात्रजमधील जुन्या खुनाचा बदला घेण्याची पार्श्वभूमी असल्याचा पोलिसांना संशय आहे. कात्रज परिसरातील संतोषनगर येथे २० एप्रिल २०२५ रोजी जमिनीच्या वादातून शुभम सुभाष चव्हाण (वय २८, रा. कात्रज) याची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी मंदार किवळे याला लक्ष्य करण्यात आल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे. शुभम चव्हाण याचा भाऊ अक्षय सुभाष चव्हाण (वय २०) हा या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे.

या प्रकरणात अमोल रामचंद्र चव्हाण (वय ४८), स्वप्नील बाजीराव गवळी (वय २८), ओंकार संतोष पवार (वय १९) आणि सूरज साधू मळेकर (वय २२) यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींनी हल्ल्याचे नियोजन कसे केले, त्यांना शस्त्रे कोणी उपलब्ध करून दिली आणि या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

२५ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास शिवाजीनगर सत्र न्यायालयासमोरील रस्त्यावर ही घटना घडली. दोन दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी मंदार किवळे याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तुलातून गोळी न सुटल्याने तो बचावला. त्यानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने त्याच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. डोक्यावर वार होऊ नयेत म्हणून मंदारने दोन्ही हातांनी डोके झाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, या हल्ल्यात त्याच्या एका हाताचा पंजा मनगटापासून तुटून लोंबकळू लागला. गंभीर जखमी झालेल्या मंदारला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. न्यायालयासारख्या महत्त्वाच्या परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ निर्माण झाली.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढत काही तासांतच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, गुरुवारी न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपींकडून पोलिसांना तपासात सहकार्य केले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मंदार किवळे याची बाजू मांडताना ॲड. शुभांगी परुळेकर यांनी, तो केवळ नशिबाने या हल्ल्यातून बचावला असून, त्याच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. मंदार सध्या जीवनासाठी संघर्ष करीत असून, त्याला न्याय मिळणे आवश्यक आहे. हल्ल्याचा कट नेमका कसा रचण्यात आला, याची सखोल चौकशी होण्यासाठी आरोपींची अधिक दिवस पोलीस कोठडी आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली.

दुसरीकडे, पोलिसांनी न्यायालयाकडे दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. हल्ल्यासाठी वापरलेले पिस्तूल कुठून आणण्यात आले, आरोपींना आर्थिक मदत कोणी केली आणि संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. आरोपींनी पूर्वनियोजन करून थंड डोक्याने हा हल्ला केल्याचेही पोलिसांनी नमूद केले. तसेच, आरोपी हे यापूर्वीच्या गुन्ह्यांची नोंद असलेले सराईत गुन्हेगार असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.

जुन्या खुनाचा बदला घेण्यासाठी न्यायालय परिसरातच अशा प्रकारे गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करण्याचे धाडस करण्यात आल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत हल्ल्याचा कट, शस्त्रांची उपलब्धता, आर्थिक मदत आणि पडद्यामागील सूत्रधार याबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळतात का, याकडे आता लक्ष लागले आहे.