राजस्थानच्या आदिवासी राजकारणात ‘बीएपी’चा नवा इतिहास

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
जयपूर
rajasthan zila pramukh election
राजस्थानमधील उदयपूर विभागातील बांसवाडा आणि डुंगरपूर जिल्ह्यांच्या जिल्हा प्रमुख निवडणुकीत भारत आदिवासी पार्टीने (बीएपी) ऐतिहासिक यश मिळविले आहे. या दोन्ही जिल्ह्यांत प्रथमच बीएपीचे जिल्हा प्रमुख निवडून आले आहेत. बांसवाड्यात भाजप आणि बीएपीच्या आघाडीने काँग्रेसचा अवघ्या एका मताने पराभव केला, तर डुंगरपूरमध्ये दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्यानंतर चिठ्ठीद्वारे बीएपीच्या उमेदवाराचा विजय निश्चित झाला. या निकालांमुळे आदिवासीबहुल भागातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे चित्र आहे.


बांसवाडा जिल्हा परिषदेत बीएपीच्या रीना रावत यांची जिल्हा प्रमुखपदी निवड झाली. या निवडणुकीसाठी भाजप आणि बीएपी यांच्यात आघाडी झाली होती. ४३ सदस्यांच्या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे २१, बीएपीचे १७ आणि भाजपचे पाच सदस्य होते. भाजपच्या पाच सदस्यांच्या पाठिंब्यामुळे बीएपीच्या रीना रावत यांना एकूण २२ मते मिळाली. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार विकास बामणिया यांना २१ मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे काँग्रेसचा एका मताने पराभव झाला. भाजप-बीएपी आघाडीच्या एकजुटीने निवडणुकीचे संपूर्ण गणित बदलले आणि रीना रावत यांनी जिल्हा प्रमुखपद पटकावले.

डुंगरपूरमध्ये जिल्हा प्रमुखपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. येथे बीएपीचे अनुतोष रोत विजयी झाले. या पदासाठी भाजपचे कांतिलाल डामोर आणि बीएपीचे अनुतोष रोत यांच्यात लढत झाली. मतदानात दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी १४ मते मिळाल्याने निकाल समान राहिला. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेनुसार चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्यात आला. चिठ्ठीत अनुतोष रोत यांचे नाव निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. निकाल जाहीर होताच बीएपीच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला. विशेष म्हणजे, डुंगरपूरमध्ये काँग्रेसचे नऊ जिल्हा परिषद सदस्य मतदानासाठी उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेसची बाजू कमकुवत झाली.

दोन्ही जिल्ह्यांतील बीएपीच्या विजयाकडे आदिवासीबहुल भागात पक्षाचा वाढता प्रभाव आणि बदलत्या राजकीय समीकरणांचे संकेत म्हणून पाहिले जात आहे. प्रथमच दोन्ही जिल्ह्यांत पक्षाचे जिल्हा प्रमुख निवडून आल्याने स्थानिक राजकारणात नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे.

दरम्यान, राजस्थानमधील ३७ जिल्ह्यांच्या जिल्हा प्रमुख निवडणुकीच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, काँग्रेसने २४ जिल्ह्यांत सर्वोच्च पद मिळविले, तर भाजपने १० जिल्ह्यांत विजय मिळविला. आदिवासीबहुल भागात बीएपीने दोन जिल्ह्यांत सत्ता मिळविली. हनुमान बेनीवाल यांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीने (आरएलपी) नागौरमधील आपले वर्चस्व कायम राखले.

या निवडणुकीतील आणखी एक महत्त्वाचा निकाल म्हणजे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या गृहजिल्ह्यात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. भरतपूरमध्ये काँग्रेसच्या रेनू वाला यांनी भाजपच्या पूजा जाटव यांचा पराभव केला. जिल्हा परिषदेत सदस्यसंख्येच्या आधारे बहुमत मिळविणे म्हणजे जिल्हा प्रमुखपद निश्चित होणे नव्हे, हेही या निकालांनी दाखवून दिले. २३ जिल्ह्यांत स्पष्ट बहुमत असूनही चुरू जिल्ह्यात भाजपच्या कनिका सिंह यांनी जिल्हा प्रमुखपदाची निवडणूक जिंकली.

काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असलेल्या २३ जिल्ह्यांपैकी २२ जिल्ह्यांत पक्षाने जिल्हा प्रमुखपद मिळविले. काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हा प्रमुखांमध्ये अलवरच्या अनिता मीना, बाडमेरचे गफूर अहमद, भरतपूरच्या रेनू बाला, भीलवाडाचे कैलाश मीना, बिकानेरच्या निकिता डूडी, बूंदीच्या हंसा गुर्जर, चित्तौडगडच्या रत्नी देवी, दौसाच्या बीना बैरवा, धौलपूरच्या अनिशा सिंह, हनुमानगडच्या रेणू जांगू, जयपूरचे यशवीर सूरा, जैसलमेरच्या संतोष कुमारी, जालोरचे आसू राम, झुंझुनूच्या कोमल भंवरिया, जोधपूरच्या प्रमिला चौधरी, कोटपुतली-बहरोडचे रामनिवास यादव, फलोदीचे यशवंत कंवर, राजसमंदच्या सुंदर देवी, सवाई माधोपूरच्या आशा देवी, सीकरच्या सुनीता गठला, सिरोहीचे गुमान सिंह देवडा आणि टोंकच्या अलका बैरवा यांचा समावेश आहे. दौसा, जैसलमेर आणि सवाई माधोपूर येथे काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.