नागपूरच्या विकासासाठी ४० हजार कोटींची गुंतवणूक

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
नागपूर
nagpur infrastructure development
नागपूर शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास, बाजारपेठांचे आधुनिकीकरण आणि व्यावसायिक संधींच्या विस्तारासाठी सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावित गुंतवणुकीचा महत्त्वाकांक्षी विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून नागपूरला देशाच्या विकासगाथेतील महत्त्वाचे केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने ३० नोव्हेंबर रोजी ‘रायझिंग नागपूर पायाभूत सुविधा गुंतवणूक परिषद-२०२६’ आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी), नागपूर महानगरपालिका आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल रॅडिसन ब्लू येथे सायंकाळी ४ वाजता या परिषदेचे आयोजन होणार आहे.



या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि महापौर नीता ठाकरे यांचीही उपस्थिती राहणार आहे.

‘पीपीपी, बीओटी आणि डीबीएफओटी मॉडेलद्वारे पायाभूत सुविधांच्या संधी’ ही या परिषदेची प्रमुख संकल्पना आहे. धोरणकर्ते, संस्थात्मक गुंतवणूकदार, पायाभूत सुविधा निधी, विकासक, ईपीसी कंपन्या आणि वित्तीय संस्थांना एकाच व्यासपीठावर आणून नागपूर व विदर्भातील गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

प्रस्तावित विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील कॉटन मार्केट, नेताजी मार्केट, संत्रा मार्केट, कमाल चौक, सक्करदरा मार्केट, इतवारीतील लोहा ओळी, गणेशपेठ फूल बाजार आणि आशीर्वाद नगर मार्केट यांचा पुनर्विकास प्रस्तावित आहे. याशिवाय अजनी इंटरमोडल स्टेशन, अजनी सेंट्रल पार्क, काचीपुरा जमिनीचा पुनर्विकास, न्यू नागपूर प्रकल्प, गणेशपेठ आणि मोर भवन येथील ट्रान्झिट टर्मिनल्स तसेच यशवंत स्टेडियम परिसरातील विकासकामांचाही समावेश आहे. अंबाझरी तलाव परिसर विकासाचाही प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

या प्रकल्पांमध्ये आधुनिक व्यावसायिक संकुले, किरकोळ विक्री केंद्रे, निवासी सुविधा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे आणि संस्थात्मक पायाभूत सुविधांचा समावेश असेल. प्रकल्पबाधित रहिवाशांसाठी घरे, सुशोभित सार्वजनिक जागा आणि नियोजित निवासी वस्त्यांची निर्मिती करण्यावरही भर राहणार आहे.

नागपूरच्या विकासाला विमान वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि शैक्षणिक क्षेत्रातील गुंतवणुकीची जोड मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा सात हजार कोटी रुपयांचा मास्टर प्लॅन, सिंधी येथील ५०० कोटी रुपयांचा मल्टिमोडल लॉजिस्टिक्स पार्क, मिहानमधील औद्योगिक विस्तार तसेच एम्स, आयआयएम, आयआयआयटी आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासारख्या संस्थांमधील गुंतवणूक नागपूरच्या आर्थिक विकासाला चालना देत आहे.

एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले की, आधुनिक शहरी, व्यावसायिक आणि संस्थात्मक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्याची क्षमता आहे. ‘रायझिंग नागपूर’च्या माध्यमातून गुंतवणूकदार आणि विकासकांना निश्चित प्रकल्पांची माहिती देऊन योग्य भागीदारी मॉडेल विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

खासगी भांडवल आकर्षित करणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि नागपूरचे शहरी जीवनमान उंचावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘विकसित नागपूर, विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत’ या संकल्पनेला बळ देणारी ही परिषद ठरणार आहे.