अनिल कांबळे
नागपूर,
crime news तुळसीनगर परिसरात व्यावसायिकाच्या कर्मचाऱ्यांकडून लुटलेले ३.७४ कोटी रुपये शोधताना पोलिस मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील डोरलीमाल गावात पोहोचले. गावातील शेतात भुशाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवलेली तीन पोती बाहेर काढताच परिसरात खळबळ उडाली. शेजारच्या गावात नुकत्याच घडलेल्या हत्येच्या घटनेमुळे पोत्यांमध्ये मृतदेह असल्याचा संशय ग्रामस्थांना आला. मात्र, पोती उघडताच त्यात नोटांची बंडले दिसल्याने ग्रामस्थही थक्क झाले.

लुटीनंतर कोट्यवधींची रोकड सुरक्षित ठेवण्यासाठी आरोपींनी शेतातील भुशाच्या ढिगाऱ्याचा आधार घेतल्याचे तपासातून समोर आले आहे. मात्र, एवढी मोठी रक्कम व्यावसायिकाकडे असल्याची अचूक माहिती आरोपींपर्यंत कोणी पोहोचवली आणि या लुटीचा मुख्य सूत्रधार कोण, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. या प्रकरणात चंद्रकांत बघेल (२५), रजनीकांत चंद्रवाल (२८) आणि अरविंद डहरवाल (३०), तिघेही रा. बालाघाट, यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने चंद्रकांतला २८ नोव्हेंबरपर्यंत, तर रजनीकांत आणि अरविंदला २९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. लुटीच्या रकमेचे वाटप, इतर साथीदारांची भूमिका आणि रोकड लपविण्यासाठी करण्यात आलेल्या मदतीबाबत त्यांची चौकशी सुरू आहे.
४० गावांची तपासणी; कॅमेऱ्याने दाखवली दिशा
सशस्त्र आरोपींनी ब्रेझा कारचा वापर करून लूट केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर रोकड असलेली कार कामठी रोडवरील खैरी परिसरात सोडून आरोपी दुसऱ्या वाहनाने रामटेक-खिंडसी तलाव मार्गे बालाघाटच्या दिशेने गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी ४० गावांमध्ये तपास केला. अनेक ठिकाणी सलग २० किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते. अशा परिस्थितीत रामटेकपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावरील एका ग्रामपंचायतीच्या कॅमेऱ्यात संशयित कार दिसली. याच फुटेजच्या आधारे तपासाची दिशा स्पष्ट झाली आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने पथक डोरलीमाल गावातील शेतापर्यंत पोहोचले.
४६ लाखांचा शोध
भुशाच्या ढिगाऱ्याखाली लपवलेल्या तीन पोत्यांमधून पोलिसांनी सुमारे ३ कोटी २८ लाख रुपये जप्त केले. उर्वरित ४६ लाख रुपये कुठे गेले, याचा शोध सुरू आहे.crime news अरविंद डहरवालच्या नातेवाइक शुभम डहरवालने रोकड लपविण्यास मदत केल्याचा संशय असून, आर्थिक लाभाच्या आमिषातून अरविंदने स्वतःच्या शेतात रक्कम लपविण्यास संमती दिल्याचे सांगितले जाते. या प्रकरणातील शुभम डहरवाल, अभय ऊर्फ बच्चा यादव, विशाल सोनगडे, रितेश मरसकोल्हे यांच्यासह अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. नागपुरात टॅक्सी चालवणाऱ्या शुभमची भूमिका तपासली जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे एक हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज, मोबाईल लोकेशन, टोल प्लाझावरील नोंदी आणि फास्टॅगचा तपशील तपासला आहे.