संजू-अझरुद्दीनने गाजवला मैदानात जलवा!

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
केरळ,
sanju-and-azharuddin-dazzled-on-the-field सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीमध्ये केरळच्या फलंदाजांनी गुरुवारी दमदार कामगिरी करत हिमाचल प्रदेशच्या गोलंदाजांची धुलाई केली. सलामीवीर मोहम्मद अझरुद्दीनने शतकी खेळी साकारली, तर कर्णधार संजू सॅमसनने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या २१ चेंडूंमध्ये ४४ धावा कुटल्या. या दोघांच्या शानदार खेळीच्या जोरावर केरळने २० षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात २६८ धावांचा मोठा डोंगर उभा केला.
 
sanju-and-azharuddin-dazzled-on-the-field
 
मोहम्मद अझरुद्दीनने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत हिमाचल प्रदेशच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याने ५७ चेंडूंचा सामना करत १०१ धावा फटकावल्या. या खेळीत आठ चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या संजू सॅमसननेही धावांचा वेग कायम ठेवला. त्याने अवघ्या २१ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४४ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट २०९.५२ इतका होता.
 
केरळच्या अन्य फलंदाजांनीही धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. विष्णू विनोदने ११ चेंडूंत २२, तर सलमान नझीरने १५ चेंडूंत २६ धावा केल्या. अखेरच्या टप्प्यात अब्दुल बासितने अवघ्या पाच चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद २४ धावा ठोकत संघाच्या धावसंख्येला आणखी वेग दिला. त्यामुळे केरळला २६८ धावांपर्यंत मजल मारता आली.
 
दुसरीकडे, मुंबई आणि उत्तराखंड यांच्यातील सामन्यात मुंबईने ८६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादव केवळ एक धाव करून माघारी परतला, तर शिवम दुबे पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मात्र मुशीर खानने ४० चेंडूंत ६५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत मुंबईला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्याच्या खेळीमुळे मुंबईला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले आणि संघाने दणदणीत विजय नोंदवला.
 
दरम्यान, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा साखळी टप्पा गुरुवारी संपत आहे. स्पर्धेतील सुपर लीगचे सामने ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, अंतिम सामना ६ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. आता पुढील फेरीत कोणते संघ स्थान मिळवतात आणि विजेतेपद कोणता संघ पटकावतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.