मुंबई
sharad pawar राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नियमित आरोग्य तपासणीसाठी ते रुग्णालयात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले. पवारांची प्रकृती सध्या उत्तम असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समजताच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्याचे कळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरू असलेली पक्षाची बैठक सोडून तातडीने ब्रीच कँडी रुग्णालय गाठले. त्यांनी डॉक्टरांची भेट घेऊन पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पवारांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांना त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक सुरू असताना हा प्रकार घडला. या बैठकीला शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, रोहित पवार आणि अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक विषयांवर चर्चा सुरू होती. मात्र, शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच सुप्रिया सुळे यांनी बैठक अर्धवट सोडून रुग्णालयाकडे धाव घेतली.
१५ दिवसांपूर्वीही बिघडली होती प्रकृती
दिवाळीच्या काळात, सुमारे १५ दिवसांपूर्वीही शरद पवार यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते मुंबईत आले; मात्र त्याच संध्याकाळी पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेही दोन दिवस उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते.
उपचारानंतर डॉक्टरांनी पवारांना प्रवास टाळण्याचा सल्ला दिला होता. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी पुन्हा सार्वजनिक आणि राजकीय कामकाजाला सुरुवात केली होती. नुकतीच त्यांनी पुण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून घेतलेल्या ऊस उत्पादनाच्या माहितीची पाहणीही केली होती. मात्र, आता पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.