नवी दिल्ली,
amit-shah संविधान दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर टीका करत सत्तेचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार जनतेकडेच असल्याचे स्पष्ट केले. दिल्लीतील श्यामा प्रसाद मुखर्जी सिव्हिक सेंटर येथे आयोजित संविधान गौरव दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी संविधानाचे महत्त्व, त्यातील मूल्ये आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेबाबत आपली भूमिका मांडली.
स्वातंत्र्यानंतर संविधानाकडे प्रामुख्याने सरकार चालवण्यासाठी मार्गदर्शक दस्तऐवज म्हणून पाहिले गेले. मात्र, त्यातील मूलभूत विचार आणि मूल्ये देशातील तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही, अशी खंत शाह यांनी व्यक्त केली. संविधानाचा सन्मान करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर २०१५ पासून दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. संविधानातील आदर्श शाळा, महाविद्यालये आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत, हा त्यामागील उद्देश असल्याचे शाह म्हणाले.
विरोधकांवर टीका करताना त्यांनी सत्तेच्या अधिकाराचा उल्लेख केला. देशात कोणाला सत्ता द्यायची आणि कोणाच्या हातात शासनाची सूत्रे सोपवायची, हे ठरवण्याचा अधिकार केवळ जनतेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संविधान निर्मात्यांनी लोकांना सत्तेचा निर्णय घेण्याचा अधिकार दिला असून, सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक सरकारने घटनात्मक मर्यादांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. संविधानाच्या उद्देशिकेतील प्रत्येक शब्दामागे महान भारत घडवण्याची संकल्पना असल्याचे शाह यांनी सांगितले.
संविधानाचा मूळ आशय समजून घेण्याचे आवाहन करताना शाह यांनी संविधानाच्या मूळ प्रतीतील चित्रांचा संदर्भ दिला. संविधानाच्या प्रत्येक भागाच्या सुरुवातीला भारतीय संस्कृती आणि इतिहासातील महत्त्वाच्या प्रसंगांचे चित्रण करण्यात आले आहे. यामध्ये भगवान श्रीरामांचे अयोध्येत आगमन, भगवान बुद्ध, भगवान महावीर, गुरु गोविंदसिंह, राणी लक्ष्मीबाई, दांडी यात्रा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित चित्रांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
संविधान हातात घेऊन फिरणाऱ्यांनी संसद ग्रंथालयाला भेट देऊन मूळ संविधान पाहावे आणि त्यातील चित्रांच्या माध्यमातून त्याचा गाभा समजून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यासाठी प्रत्येकाने किमान १० ते १५ मिनिटे वेळ द्यावा, असे शाह म्हणाले. समान नागरी संहितेच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. संविधान निर्मात्यांनी समान नागरी संहितेचा समावेश राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केला आहे. धर्म कोणताही असला तरी देशातील सर्व नागरिकांसाठी समान कायदा असावा आणि धर्माच्या आधारावर वेगवेगळे कायदे असू नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
नक्षलवादाच्या समस्येचा उल्लेख करताना शाह यांनी बस्तरमधील दुर्गम भागातील नागरिकांच्या परिस्थितीचे उदाहरण दिले. ८० वर्षांच्या व्यक्तीकडे रेशनकार्ड नसणे, मतदार यादीत नाव नसणे, घरात वीज आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे, ही परिस्थिती नक्षलवादामुळे झालेल्या नुकसानीचे चित्र स्पष्ट करते, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर नक्षलवादाचे उच्चाटन केले असून, २१ कोटी लोकांपर्यंत संविधानाने दिलेले हक्क पोहोचवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.