‘ते’ वाहतूक पोलिस अजूनही चौकशीच्या फेऱ्यात !

- पोलिस कर्मचाऱ्यांना अहवालाची प्रतीक्षा

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
traffic police शहर वाहतूक शाखेच्या वेगवेगळ्या परिमंडळात कार्यरत तब्बल १६ वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना कर्तव्यात निष्काळजीपणा आणि प्रशासकीय कारणास्तव थेट पोलिस मुख्यालयात संलग्न करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी काही कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे धाव घेतली होती. त्यामुळे पोलिस उपायुक्तांनी पुनर्चौकशीचे आदेश दिले होते. गेल्या एका महिन्यापासून ते पोलिस कर्मचारी अद्यापही चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.
 

traffic police 
 
 
शहरातील अस्ताव्यस्त झालेली वाहतूक व्यवस्था नीट करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. अनेक परिमंडळात पोलिस कर्मचारी नसल्यामुळे दंडात्मक कारवाईसह वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अशातच पोलिस आयुक्तालयात वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या १६ पोलिस कर्मचाऱ्यांना २३ ऑक्टोबरला तडकाफडकी पोलिस मुख्यालयाला संलग्न करण्यात आले होते. प्रशासकीय कारणास्तव मुख्यालयात सलग्न केल्याचे आदेश तत्कालिन मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी काढले होते. पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध विविध स्वरुपाच्या तक्रारी होत्या तसेच कर्तव्य बजावताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र, या यादीतील काही कर्मचाऱ्यांना संलग्न केल्यामुळे धक्का बसला. ‘कर्तव्यात कोणताही कसूर केल्याचा किंवा कोणतीही तक्रार नसूनही मुख्यालयात संलग्न केल्यामुळे या संलग्नतेमुळे अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे.traffic police या कर्मचाऱ्यांची पुनर्चौकशी वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त गिरीश बने करीत आहेत. मात्र, गेल्या महिन्याभरापासून अद्यापही चौकशी सुरु असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
‘तो लाडका कर्मचारी कोण?’
वाहतूक शाखेतील ‘त्या’ १६ कर्मचाऱ्यांना मुख्यालयात संलग्नतेचे आदेश आल्यानंतर सोडण्यासाठी सूचना आल्या होत्या. मात्र, त्या १६ पैकी १५ पोलिस कर्मचाऱ्यांना परिमंडळातून सोडण्यात आले आहे. मात्र, एक पोलिस कर्मचारी अद्यापही ‘काम’ करीत आहे. त्यामुळे तो लाडका पोलिस कर्मचारी कोण? अशी चर्चा सध्या सुरु आहे.
कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून सहायक पोलिस आयुक्तांकडे पुनरचौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल. सध्या त्या अंमलदारांना मुख्यालयात संलग्न करण्यात आले आहे. अहवालानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
- आदित्य मिरखेलकर (पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.)