गोंदिया,
police vehicle accident गंगाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलिस वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील तीन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी २५ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. धडक एवढी जोरदार होती की, तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला. तसेच संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मृतांमध्ये खळबंदा येथील रितेश बावनकर (वय १७), शिवप्रसाद कांबळे (वय १७) आणि तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील कार्तिक बिसेन (वय २०) यांचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार, तिघेही दुचाकीने जात असताना दांडेगाव बसस्थानकाजवळ गंगाझरी पोलिस ठाण्याच्या वाहनाची दुचाकीला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात पोलिस वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तीन युवकांच्या मृत्यूमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिकांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी करीत रस्त्यावर टायर जाळून निषेध नोंदविला. संबंधित पोलिस वाहनाच्या धडकेमुळेच हा अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.police vehicle accident दोषी पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून तीन तरुणांच्या मृत्यूने खळबंदा आणि सेजगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या अपघाताची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. तेव्हा पोलिस विभागाकडून कोणती कारवाई करण्यात येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.