भारतावर २० टक्के टॅरिफ लादण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली
trump proposes
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने भारतावर ‘स्ट्रक्चरल एक्सेस कॅपॅसिटी’ अर्थात संरचनात्मक अतिरिक्त उत्पादन क्षमतेचा आरोप करीत भारतीय वस्तूंवर २० टक्के टॅरिफ लादण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, भारताने अमेरिकेचा हा आरोप स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. देशातील कोणत्याही क्षेत्रात अशा प्रकारची अतिरिक्त उत्पादन क्षमता नसल्याचे भारताने स्पष्ट केले असून, व्यापारासंबंधीच्या प्रश्नांवर एकतर्फी निर्णय घेण्याऐवजी सुरू असलेल्या द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची भूमिका मांडली आहे.



अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने (यूएसटीआर) ‘सेक्शन ३०१’ अंतर्गत घेतलेल्या निर्णयासंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भातील नोटीस मंत्रालयाच्या निदर्शनास आली असून, तिचा सध्या सविस्तर अभ्यास करण्यात येत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. संपूर्ण चौकशी प्रक्रियेदरम्यान भारताने रचनात्मक पद्धतीने सहकार्य केले आहे. तसेच, चौकशीच्या वेळी भारतातील कोणत्याही औद्योगिक क्षेत्रात संरचनात्मक अतिरिक्त उत्पादन क्षमता नसल्याचे अमेरिकेला स्पष्टपणे सांगण्यात आले होते, असेही भारताने नमूद केले आहे.

ट्रम्प प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या नव्या व्यापार चौकटीअंतर्गत भारतीय वस्तूंवर १७ टक्के टॅरिफ आकारण्याचा पर्यायही मांडण्यात आला आहे. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या शुल्काच्या यादीत भारतीय निर्यातीवर २५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क आकारण्याची तरतूद असल्याचे वृत्त आहे. मात्र, भारत आणि ट्रम्प प्रशासन यांच्यात व्यापार करार झाला, तर हे शुल्क १७ टक्क्यांपर्यंत कमी केले जाऊ शकते. त्यामुळे प्रस्तावित शुल्काच्या दराबाबत अंतिम निर्णय हा दोन्ही देशांमधील व्यापार चर्चेच्या परिणामावर अवलंबून राहण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या मते, काही देशांनी जागतिक मागणीच्या तुलनेत अधिक उत्पादन क्षमता आणि विनिर्माण व्यवस्था विकसित केली आहे. परिणामी, अतिरिक्त उत्पादनाचा मोठ्या प्रमाणावर जागतिक बाजारपेठेत पुरवठा होतो. त्यामुळे वस्तूंच्या किमती घसरतात आणि संबंधित देशांमधील स्थानिक उद्योगांवर आर्थिक दबाव निर्माण होतो. अशा परिस्थितीला आळा घालण्यासाठी अतिरिक्त उत्पादन क्षमता असलेल्या देशांच्या आयातीवर शुल्क लावण्याची भूमिका अमेरिकेने घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतासह काही देशांच्या निर्यातीवर नव्या शुल्काचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला आहे.

दरम्यान, हे प्रस्तावित टॅरिफ तातडीने लागू होणार नाहीत. अमेरिकेने सध्या ही प्रक्रिया सार्वजनिक परामर्शासाठी खुली केली असून, उद्योग क्षेत्र, व्यापार संघटना आणि अन्य संबंधित घटकांकडून सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. अमेरिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रस्ताव प्रत्यक्षात लागू करण्याचा निर्णय झाल्यास जानेवारी २०२७ ही त्यासाठीची सर्वांत संभाव्य सुरुवातीची मुदत असू शकते.

विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाने लागू केलेले व्यापक जागतिक टॅरिफ रद्दबातल ठरविले होते. राष्ट्राध्यक्षांनी शुल्कवाढीसाठी वापरलेल्या कायदेशीर तरतुदीच्या आधारे अशा प्रकारचे आयात शुल्क लावण्याचा अधिकार व्हाइट हाऊसला नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. तथापि, वाहन उद्योग आणि पोलाद क्षेत्रासारख्या काही विशिष्ट उत्पादनांवरील क्षेत्रनिहाय आयात शुल्क अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने नव्याने व्यापार शुल्कवाढीचा प्रस्ताव मांडल्याने भारत-अमेरिका व्यापार संबंधांतील घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.