३५ वर्षांच्या अन्यायाविरोधात ७७ वर्षांच्या वृद्धेचे आंदोलन

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
वर्धा,
77-year-old-woman-protests वृद्धेला घर खाली करण्यासाठी धमक्या देऊन बक्षीसपत्राच्या साहाय्याने अनेकांना प्लॉट विकण्यात आला असून आपली नायडू कुटुंबाने फसवणूक केली आहे. त्यामुळे इसारपत्रानंतर भूखंडाची विक्रीही करून देण्यात आली नाही. दरम्यान, प्रकरणाची चौकशी करून नायडू कुटुंबावर कारवाई करावी, घराचे पक्की विक्रीपत्र करून देण्यात यावे, या मागणीसाठी ७७ वर्षीय कल्पना गोवर्धन यांनी गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. मागील ३५ वर्षांपासून त्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
 
 
77-year-old-woman-protests
 
शहरातील लक्ष्मीनगर येथील कल्पना गोवर्धन यांनी ३५ वर्षांपूर्वी कोना नायडू यांच्याकडून भूखंड क्र. ७७ आराजी ५०७.६० चौ. फूट जागेचे २५ हजार रुपये देऊन इसारपत्र केले होते. इसारपत्रानंतर सदर प्लॉटची विक्रीपत्र करून देण्यात नायडू यांनी टाळाटाळ केली. ३५ वर्षांपूर्वी त्यांनी घर बांधले. आता नायडू यांच्याकडून आपल्याला घर खाली करण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. याशिवाय प्लॉट अनेक लोकांना बक्षीसपत्राच्या आधारे विकण्यात आल्याचा आरोपही गोवर्धन यांनी केला. नायडू परिवाराने आपली फसवणूक केल्याचा आरोप गोवर्धन यांनी केला.
 
मालमत्ता आपल्या नावावर हस्तांतरित झाली नाही. यासंदर्भातील न्यायालयीन दावा सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आपण वास्तव्यास असलेल्या घरावर आयसीआयसीआय बँक शाखा हिंगणघाट येथून कर्ज घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. या प्रकारामागे माझ्या ताब्यातील घरावर बेकायदेशीर हक्क निर्माण करून मला घराबाहेर काढण्याचा व मालमत्तेवर कब्जा करण्याचा हेतू असल्याची भीतीही गोवर्धन यांनी व्यक्त केली. आपण वास्तव्यास असलेल्या घरावर कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर व्यवहार, कर्ज प्रक्रिया किंवा ताबा हस्तांतरण होणार नाही, यासाठी आवश्यक ती कारवाई करावी. तसेच संबंधित व्यक्तींविरुद्ध कायद्यानुसार योग्य ती कारवाई करून आपल्याला संरक्षण व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही कल्पना गोवर्धन यांनी केली आहे.
व. पु. काळे यांच्या पुस्तकाची आठवण
व. पु. काळे यांच्या ‘आपण सारे अर्जुन’ या पुस्तकात ७० वर्षांच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेलं पाहून विचारलं, आजी आज इथे काय आहे? त्यावर ती थरथरत्या मानेनी उत्तरली, १७ व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता, त्याचा आज निकाल आहे. असाच काहीसा प्रकार आज वर्धेतही गांधी पुतळ्यासमोर अनुभवायला मिळाला. नायडू परिवाराकडून विकत घेतलेल्या घराचा ३५ वर्षांपासून निवाडा न झाल्याने ७७ वर्षांची म्हातारी थंडीत कुडकुडत कालपासून उपोषणाला बसलेली आहे. जिल्ह्यातील प्रशासनाला लाज आणावी, अशी ही घटना संविधान दिनी पुढे आली आहे.