नवी दिल्ली,
amit-shah-ucc-bjp-statesकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपशासित सर्व राज्यांमध्ये समान नागरी संहिता लागू केली जाईल, अशी घोषणा गुरुवार, संविधान दिनी केली. तसेच धर्माच्या आधारावर कायदे बनवले जाऊ नयेत, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले की, राज्यघटनेच्या निर्मात्यांनी राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समान नागरी संहितेचा समावेश केला होता.
तर धर्माचा विचार न करता प्रत्येक नागरिकासाठी समान कायद्याची कल्पना केली होती. “आपल्या संविधान निर्मात्यांनी समान नागरी संहितेचा समावेश आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केला आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाला मग तो हिंदू, शीख, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा पारसी कोणताही धर्म असो एकाच समान कायद्याखाली जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. धर्माच्या आधारावर कायदे बनवले जाऊ नयेत, ज्याला तुमचा पक्ष, राहुलजी, पूर्णपणे नाकारतो. आज मी हे स्पष्टपणे सांगायला आलो आहे की, येत्या काळात जिथे कुठे भाजपचे सरकार असेल , तिथे आम्ही समान नागरी संहिता लागू करणार आहोत,” असे ते म्हणाले.
गोवा, उत्तराखंड, गुजरात, आसाम आणि मध्य प्रदेश यांनी आतापर्यंत समान नागरी संहिता लागू केली आहे. गृहमंत्री राजकीय सत्तेचे हस्तांतरण आणि वापर नियंत्रित करणाऱ्या घटनात्मक चौकटीबद्दलही बोलले. ते म्हणाले की, राज्य कोण करणार हे ठरवण्याचा अधिकार संविधानाने नागरिकांना दिला आहे. त्याचबरोबर निवडून आलेल्या सरकारांना घटनात्मक मर्यादेत राहून काम करणे बंधनकारक केले आहे. “त्यांनी जनतेला कोणाला सत्ता द्यायची हे ठरवण्याचा अधिकार दिला आणि ज्यांना सत्ता मिळते. त्यांच्यासाठी शासनप्रणाली संविधानाच्या चौकटीतच चालवली पाहिजे, असा मार्ग त्यांनी निश्चित केला,” असे शाह म्हणाले. ते पुढे म्हणाले की, प्रस्तावनेतील प्रत्येक शब्द हा एका महान भारताच्या उभारणीचा पाया घालण्याच्या उद्देशाने लिहिला गेला होता. शाह पुढे म्हणाले की, भारताने रक्तपात न होता अनेक सत्तांतरे पाहिली आहेत आणि प्रत्येक संक्रमण घटनात्मक प्रक्रियेनुसारच पार पडले आहे.