अनिल कांबळे
नागपूर,
crime news अध्यापकनगरात १७ वर्षीय अर्जुनवर गोळीबार करण्यात आल्यानंतर तो सद्धा एम्स रुग्णालयात जीवन-मृत्यूशी झुंज देत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक केली असून शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिली आहे.
दुसरीकडे, गोळीबाराच्या घटनेनंतर घटनास्थळावरील सीसीटीव्हीचा डीव्हीआर लपविण्यात आल्याने या प्रकरणात आणखी संशय निर्माण झाला आहे. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, अर्जुन गेल्या दीड ते दोन वर्षांपासून शैलेश हिरामण गुल्हाने (४०) याच्याकडे डीजे ऑपरेटर म्हणून काम करीत होता. २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री शैलेशच्या घरी वाढदिवसाची पार्टी सुरू होती. यावेळी पीयूष मेंढे, ऋषिकेश जांगजोड, पराग शिवाजी चौधरी आणि भावेश संजय राव हेही उपस्थित होते. पार्टीदरम्यान कोणत्या तरी कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून शैलेशने अर्जुनला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात गोळी झाडल्याचा आरोप आहे. डोक्यात गोळी अडकल्याने अर्जुन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
शैलेशसह पाच आरोपींना अटक
हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी शैलेश गुल्हाने, पीयूष मेंढे, पराग शिवाजी चौधरी, ऋषिकेश जांगजोड आणि भावेश राव या पाच जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शैलेश गुल्हाने याच्याविरुद्ध २००७ ते २०१८ या कालावधीत एमआयडीसी आणि हुडकेश्वर पोलिस ठाण्यांत मारहाण, तोडफोड आणि हत्येसह विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, शस्त्रास्त्र कायदा आणि अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.crime news प्रकरणातील आरोपींना भेटण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्याबाहेर दिवसभर गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आरोपींच्या भेटीसाठी येणाऱ्या समर्थकांच्या जमावामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात सतत वर्दळ वाढली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.