‘ये प्रेम मोल लिया’वर प्रेक्षक फिदा! आयुष्मान-शर्वरीची जोडी हिट

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
मुंबई,
ye-prem-mol-liya बॉलिवूडमध्ये सध्या ॲक्शन आणि भव्य दृश्यांची चलती असली, तरी कौटुंबिक नाती, प्रेम आणि भावनिक प्रसंगांवर आधारित चित्रपटांची लोकप्रियता कायम आहे. दिग्दर्शक सूरज आर. बडजात्या यांनी याच जुन्या शैलीचा आधार घेत ‘ये प्रेम मोल लिया’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. आयुष्मान खुराना आणि शर्वरी वाघ यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर येत असून, चित्रपटाला सुरुवातीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
 
ye-prem-mol-liya
 
सूरज बडजात्या यांच्या चित्रपटांची खासियत असलेले कौटुंबिक वातावरण, नात्यांमधील जिव्हाळा, साधेपणा आणि प्रेमाचे भावनिक चित्रण यावेळीही पाहायला मिळत असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. अनेकांनी या चित्रपटाची तुलना ९० च्या दशकातील बॉलिवूड चित्रपटांशी केली आहे. चित्रपटातील गाणी, रंगसंगती आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. एका प्रेक्षकाने चित्रपटाला जुन्या काळातील सिनेमांचा अनुभव देणारा असल्याचे सांगत आयुष्मान, शर्वरी आणि अनुपम खेर यांच्या अभिनयाचे कौतुक केले. मात्र, पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्ध काहीसा संथ आणि लांबलेला वाटल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली.
 
चित्रपटाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना सूरज बडजात्या यांची शैली भावल्याचे सोशल मीडिया पोस्टमधून दिसून येते. एका चाहत्याने चित्रपटाची पहिली १५ मिनिटे पाहिल्यानंतरच दिग्दर्शकाचे कौतुक केले. सूरज बडजात्या यांनी पुन्हा एकदा मन जिंकले असून, त्यांच्या चित्रपटांचे चाहते असल्याची भावना या प्रेक्षकाने व्यक्त केली.
 
दरम्यान, काही प्रेक्षकांनी चित्रपटातील प्रेमकथेच्या मांडणीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आयुष्मान आणि शर्वरी यांच्या पात्रांमधील प्रेमसंबंधांची सुरुवात काहीशी घाईत झाल्याचे त्यांचे मत आहे. पहिल्याच संवादानंतर आयुष्मानचे पात्र शर्वरीच्या पात्राला लग्नाची मागणी घालत असल्याने दोघांना एकमेकांना समजून घेण्यासाठी अधिक वेळ द्यायला हवा होता, अशी मिश्किल टिप्पणी एका प्रेक्षकाने केली. हा चित्रपट उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत कुटुंबांतील प्रेक्षकांना अधिक भावू शकतो, असेही मत व्यक्त करण्यात आले. असे असले तरी चित्रपटाला चांगला कौटुंबिक मनोरंजक सिनेमा म्हणून पसंती देण्यात आली आहे.
 
काही प्रेक्षकांनी चित्रपटाला चार, तर काहींनी साडेतीन स्टार देऊन कौतुक केले आहे. एका प्रेक्षकाने चित्रपटाला हृदयस्पर्शी संबोधत सूरज बडजात्या यांच्या चित्रपटांमधील प्रामाणिकपणा, साधेपणा, चांगुलपणा आणि पारंपरिक मूल्यांचा सुंदर संगम असल्याचे म्हटले. चित्रपटाची सुरुवात भावनिक आणि आपलेपणाची जाणीव करून देणारी असल्याचेही त्याने नमूद केले. शर्वरी वाघच्या सौंदर्याचे आणि पडद्यावरील उपस्थितीचेही विशेष कौतुक करण्यात आले. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळू शकते, अशी शक्यताही एका प्रेक्षकाने व्यक्त केली.
 
दुसऱ्या एका प्रेक्षकाने चित्रपटाला साडेतीन स्टार देत कुटुंबासोबत पाहण्यासारखा असल्याचे सांगितले. पूर्वार्धात काही त्रुटी जाणवत असल्या, तरी उत्तरार्धातील भावनिक प्रसंगांनी मन जिंकल्याची प्रतिक्रिया त्याने दिली. चित्रपटात २००० च्या दशकातील सिनेमांची झलक असल्याचेही त्याचे मत आहे.
 
या चित्रपटात आयुष्मान खुराना याने प्रेम मिश्रा, तर शर्वरी वाघ हिने पूर्वा सोलंकी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांच्यासोबत अनुपम खेर, सुप्रिया पाठक, सीमा पाहवा, सौम्या टंडन, शाद रंधावा, स्वानंद किरकिरे आणि आलोक नाथ हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.
 
सूरज आर. बडजात्या यांनीच चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. राजश्री प्रॉडक्शन आणि महावीर जैन फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. कमलकुमार बडजात्या, अजित कुमार बडजात्या आणि महावीर जैन हे चित्रपटाचे निर्माते आहेत. हिमेश रेशमिया यांनी संगीत दिले असून, मनोज कुमार खट्टोई यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे. तर श्वेता व्यंकट मॅथ्यू यांनी संपादन केले आहे.
 
एकूणच, सोशल मीडियावरील सुरुवातीच्या प्रतिक्रियांनुसार जुन्या बॉलिवूडची आठवण करून देणारी प्रेमकथा, कौटुंबिक वातावरण आणि भावनिक प्रसंग यामुळे ‘ये प्रेम मोल लिया’ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, या सकारात्मक प्रतिक्रियांचे रूपांतर बॉक्स ऑफिसवरील यशात कितपत होते, हे आगामी काळात स्पष्ट होईल.