बदलापूर,
badlapur-youth-death-stray-dogबदलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. भटक्या कुत्र्यापासून बचाव करून पळणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झालाय. एकीकडे बदलापूर नगरपालिका भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे ही दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल शिंदे असं तरुणाचं नाव असून तो आपल्या मित्रांसोबत बदलापूर पश्चिमेच्या शनिनगर परिसरात मित्राला सोडण्यासाठी गेला होता. याच दरम्यान एक महिला भटक्या कुत्र्यांना तिथे अन्न खाऊ घालत होती. असं सांगितलं जातंय. यावेळी तिथलाच एक भटका कुत्रा हर्षल शिंदे आणि त्याच्या मित्राच्या मागे लागला.
हर्षलने जीवाच्या आकांताने पळ काढला आणि परिसरातील एका दुकानात आश्रय घेतला. मात्र पळताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती बदलापूर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली. या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.
हर्षलची 3 वर्षांपूर्वी हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झाली होती. कुत्र्याला घाबरून खूप जोरात पळाल्यामुळे हृदयावर ताण येऊन त्याला अटॅक आला, अशी माहितीही समोर येतीय. मात्र, या संतापजनक प्रकारानं बदलापुरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.