कोलकाता,
mimi-chakraborty बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मिमी चक्रवर्ती हिने गुपचूप विवाह केल्याची माहिती समोर आली आहे. २६ नोव्हेंबर रोजी तिने सोशल मीडियावर आपल्या साखरपुड्याचे आणि नोंदणीकृत विवाहाचे काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले. कोलकाता येथे पार पडलेल्या या खासगी सोहळ्याला कुटुंबीय आणि मोजके जवळचे मित्र उपस्थित होते. विशेष म्हणजे, लग्नाचे फोटो शेअर करताना मिमीने पतीचा चेहरा जाणीवपूर्वक लपवून ठेवला आहे.
मिमीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये दोघेही विवाहाच्या नोंदणीची कागदपत्रे पूर्ण करताना दिसत आहेत. एका छायाचित्रात त्यांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या आहेत, तर दुसऱ्या फोटोत विवाहाच्या कागदपत्रांवर सह्या करताना ते दिसतात. अन्य छायाचित्रांमध्ये अंगठ्यांची देवाणघेवाण आणि एकमेकांना मिठी मारतानाचे क्षण टिपण्यात आले आहेत. या फोटोंना तिने लाल हृदयाची इमोजी देत भावना व्यक्त केल्या आहेत.
मिमीच्या विवाहाची बातमी समोर येताच बंगाली मनोरंजनविश्वातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. अभिनेत्री सुभाश्री गांगुली, ओइंद्रिला सेन, विक्रम चॅटर्जी, पर्णो मित्रा, ईशा साहा आणि अनिंदिता बसू यांच्यासह अनेक कलाकारांनी तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत नवदाम्पत्याचे अभिनंदन केले. विवाहासाठी मिमीने सोनेरी नक्षीकाम असलेली पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती. या पारंपरिक वेशभूषेत ती विशेष सुंदर दिसत होती. तर तिच्या पतीने पांढऱ्या रंगाचा पारंपरिक पंजाबी आणि पायजमा परिधान केला होता. दोघांनीही पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या पोशाखाला पसंती दिली.
मिमीच्या पतीचे नाव सिद्धार्थ दत्ता असल्याचे समोर आले आहे. तो व्यवसायाने मरीन इंजिनिअर आहे. अभिनेत्रीने लग्नाचे फोटो शेअर करताना त्याची ओळख जाहीर केली नव्हती. मात्र, तिच्या काही इन्स्टाग्राम स्टोरीजमधून त्याचे नाव समोर आले. सिद्धार्थचे इन्स्टाग्राम अकाउंट खासगी असल्याने त्याच्याबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही. नोंदणीकृत विवाह पार पडला असला तरी या जोडप्याचा पारंपरिक विवाह सोहळा डिसेंबरमध्ये होणार आहे. ३ डिसेंबरपासून विवाहविधींना सुरुवात होणार असून, ५ डिसेंबर रोजी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने विवाह पार पडणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, मिमी चक्रवर्तीने २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बापी बारी जा' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'गाणेर ओपारे' या दूरचित्रवाणी मालिकेतील 'पप' या भूमिकेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने 'बोझेना ती बोझेना', 'गोल्पो होलियो शॉट', 'खड', 'शुधू तोमारी जोन्यो', 'की कोरे तोके बोलबो', 'पोस्टो', 'धनंजय', 'ड्रॅक्युला सर' आणि 'रक्तबीज' यांसारख्या अनेक बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे.