दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांपाठोपाठ विद्यार्थ्यांनाही प्रशासनाचा फटका!

परीक्षा शुल्क माफीसाठी प्रमाणपत्राची अट; महसूल विभागाकडून प्रमाणपत्र देण्यास नकार

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
गोंदिया,
certificate-condition-for-exam-fee-waiver दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकर्‍यांना मदतीचा लाभ मिळविताना विविध अडचणींचा सामना करावा लागत असतानाच आता विद्यार्थ्यांनाही प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी देण्याची शासनाची घोषणा असताना, प्रत्यक्ष लाभासाठी व्यवसायीक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांकडून महसूल विभागाच्या प्रमाणपत्राची अट पुढे केली जात आहे. मात्र, संबंधित महसूल विभागाकडून असे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जात असल्याने विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे. शासन निर्णय जारी झालेला असतानाही प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू असल्याने परीक्षा शुल्क माफीच्या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
 
ट्रिगर-1 व ट्रिगर-2 अंतर्गत राज्यातील 305 तालुके अंतिमतः दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले. ज्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील सर्वच तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले. दरम्यान, दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सूट देण्याची तरतूद शासनाने केली आहे. मात्र, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या गावाचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश असल्याचे महसूल विभागाचे प्रमाणपत्र मागितले जात आहे. दुसरीकडे विद्यार्थी संबंधित गावाचा रहिवासी असल्याचे स्पष्ट असतानाही महसूल विभागाकडून असे प्रमाणपत्र देता येणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली सवलत मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशासकीय अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी जिल्ह्यातील अनेक दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना शासन व प्रशासनाच्या अटी व निकषांमुळे पाच हजार रुपयांचे अग्रीम अनुदानापासून वंचित रहावे लागले आहे. त्यात आता विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीच्या बाबतीत शासन निर्णयाऐवजी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे प्रशासकीय कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच कुटुंबातील विद्यार्थ्यांना शासकीय सवलतीसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांपाठोपाठ आता विद्यार्थ्यांनाही शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. तेव्हा याबाबत स्पष्टता आणून परीक्षा शुल्क माफीचा लाभ विनाअडथळा मिळवून द्यावा, अशी मागणी विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून होत आहे.
 
विद्यार्थी व पालक संभ्रमात
यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली असता, शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे स्वतंत्र प्रमाणपत्राची आवश्यकता काय, असा उलट सवाल उपस्थित केला. मात्र, प्रत्यक्षात महाविद्यालयांकडून प्रमाणपत्राची मागणी होत असल्याने विद्यार्थी आणि पालक संभ्रमात पडले आहेत.