चंद्रपूर,
chandrapur-municipal-corporation-general-meeting रामाळा तलावाचे पूनरूज्जीवन प्रकल्प, अमृत योजना व मलनिःसारण योजनेचे काम संबंधित कंत्राटदाराने मुदतीत पूर्ण केले नसताना आणि आमसभेत मंजुरी न घेता प्रशासनाने नियमबाह्य पध्दतीने त्यास मुदतवाढ दिली असताना, या कामांची चौकशी होईपर्यंत आम्ही पुन्हा या कामांना मुदतवाढ देणार नाही, अशी ठाम भूमिका नगरसेवकांनी घेतली. अखेर या मुदवाढीच्या विषयांना स्थगिती देण्यात आली.
चंद्रपूर महानगर पालिकेची शुक्रवारी पार पडलेली आमसभा सदर तिन्ही विषयांच्या मुदतवाढीने गाजली. नगरसेवकांनी याविरूध्द तीव्र प्रतिक्रिया देत, महापौर संगीता खांडेकर आणि आयुक्त अकनुरी नरेश यांना धारेवर धरले. सदर तिन्ही कामांची एवढीच आवश्यक होती, तर तातडीने आमसभा घेऊन त्यात मुदतवाढीचा विषय का आणला नाही, आमसभेचे आयोजन का रेंगाळत ठेवले गेले आणि कुठल्या नियमाने या कामांना प्रशासनाने परस्पर मुदतवाढ दिली, असे प्रश्न उपस्थित केले गेले.
सदर कामांच्या मुदतवाढीचो विषय येताच आमसभेत पप्पू देशमुख, राजेश अडूर, राहुल घोटेकर आदी विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. नियमबाह्य पध्दतीने आधीच कामांना मुदतवाढ देऊन आता हा विषय आमसभेत मंजूर करता हे योग्य नाही, असे मत त्यांनी मांडले. त्यावर आयुक्तांना स्पष्टीकरण देत सांगितले की, या कामांना केंद्र आणि राज्य शासनाचा निधी आहे. काम सुरू ठेवले नाही तर हा निधी मिळणार नाही. त्यामुळे ही कामे मुदतीनंतरही सुरू ठेवण्यात आली. मात्र, नगरसेवकांचे समाधान झाले नाही. त्यांनी गोंधळ सुरूच ठेवला आणि त्या गोंधळातच अन्य विषय मंजूर करण्यात आले. महापौर गटाच्या राहुल पावडे आणि काही नगरसेवकांनी मात्र सदर तिन्ही योजनेचे काम महत्त्वाचे असून, ते थांबवू नये, अशी विनंती केली. अखेर या विषयांना स्थगिती दिली गेली. मात्र, त्याची संपूर्ण चौकशी करून हा विषय पुढील आमसभेत ठेवण्यावर एकमत झाले.
मंजूर झालेले विषय
अभ्यंकर शाळा येथे 14 लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधणे, स्वेच्छानिधी अंतर्गत कामाची मर्यादा 2 लक्ष रुपयावरुन 5 लक्ष रुपये करणे, मालमत्ता कराचे देयके वार्ड सखीमार्फत वाटप करणे, नगरसेवक स्वेच्छा निधी अंतर्गत विकास कामांसाठी स्वतंत्र लेखाशिर्ष निर्माण करणे, तुकूमच्या कुळमेथे लेआऊट येथील सभागृहाला राणी हिराई सभागृह असे नाव देणे आदी.